शिवशंकर मनी लाँडरिंग प्रकरण : हणजूण, आसगाव, उसकईतील जमिनींचा समावेश

म्हापसा : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पणजी विभागाने शिवशंकर मयेकर मनी लाँडरिंग प्रकरणात १२६८.६८ कोटी रुपये किमतीची ५ लाख चौरस मीटर जमीन जप्त केली. बार्देश तालुक्यातील हणजूण, आसगाव व उसकई मधील १९ स्थावर मालमत्तांचा यात समावेश आहे. यापूर्वी ईडीने १२.८५ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू आणि बँक खाती गोठवली होती.
बनावट कागदपत्रांचा वापर
संशयित आरोपी शिवशंकर मयेकर याच्या नेतृत्वाखालील गटाने जमिनींची बनावट आणि फेरफार केलेली कागदपत्रे वापरून या मालमत्ता बेकायदेशीरपणे मिळवल्या. ज्यात आफरामेंतो, वाटप प्रमाणपत्रे, अंतिम ताबा प्रमाणपत्रे, सीमांकन प्रमाणपत्र, ऐतिहासिक विक्री करारपत्र, गिफ्ट डीड आणि इतर खोट्या रेकॉर्ड्सचा समावेश आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल
म्हापसा पोलिसांनी एप्रिल २०२५ मध्ये हणजूण येथील सर्वे क्रमांक ४९६/१ मधील कोमुनिदादची लाखो चौरस मीटर जमीन बनावट दस्तावेजाद्वारे हडप केल्याचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी कोमुनिदादच्या ॲटर्नीने तक्रार दाखल केली होती. संशयित आरोपी यशवंत सावंत व इतरांविरुद्ध नोंद केलेल्या या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लाँडरिंगचा संशय व्यक्त करून प्राथमिक चौकशी सुरू केली.
१३ ठिकाणी छापे आणि अटक
ईडीने ९ सप्टेंबर २०२५ रोजी हणजूण, आसगाव, हैदराबाद येथे मिळून १३ ठिकाणी छापे टाकले. यात हणजूण कोमुनिदादची १२०० कोटी रुपये किमतीची ३.५ लाख चौरस मीटर जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. ईडीने यशवंत सावंत व इतरांकडून ७२ लाखांची रोख रक्कम, सात आलिशान गाड्या आणि महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी मुख्य सूत्रधार शिवशंकर मयेकर याला अटक केली. सध्या संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.
ईडीने क्रिप्टो करन्सी गोठवली
हणजूण व आसगावमधील बेकायदेशीरपणे जमीन संपादित केल्याप्रकरणी अजून अतिरिक्त चार गुन्हे नोंदवण्यात आल्याचे उघड झाले. चौकशीअंती ईडीने १० ऑक्टोबर रोजी गोव्यासह नवी दिल्ली, चंडीगडमध्ये मिळून सहा ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत दीड लाख अमेरिकन डॉलर्सची (१.२५ कोटी रुपये) क्रिप्टो करन्सी गोठवण्यात आली.
जमिनी बळकावण्यासाठी कट
संशयित आरोपींनी जमिनी बळकावण्यासाठी एक पद्धतशीर कार्यपद्धती अवलंबली होती. ज्यामध्ये असुरक्षित जमिनी ओळखणे, बनावट विक्री करारपत्र, गिफ्ट डीड करार, बनावट प्रमाणपत्रे तयार करणे आणि नंतर ते कोमुनिदाद प्रशासकांकडे सादर करणे यांचा समावेश होता. त्यानंतर या बनावट कागदपत्रांचा वापर निवडक व्यक्तींच्या नावे मालमत्तांचे हस्तांतरण करण्यासाठी केला जात असे.
न्यायालयात आरोपपत्र दाखल
या मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीने संशयित आरोपी शिवशंकर मयेकर, यशवंत सावंत यांच्यासह इतरांविरुद्ध मेरशी येथील सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.