मगोला तीन जागा जाहीर; विरोधी पक्षांचा युतीचा निर्णय रखडला

पणजी : गोव्यातील आगामी जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी भाजप आणि मगो पक्षाची युती निश्चित झाली असून मगोला तीन जागा देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा युतीबाबतचा निर्णय अजूनही रखडला असून, गोवा फॉरवर्ड आणि आरजीसोबत चर्चा सुरू असल्याने उमेदवारांच्या घोषणेसाठी विलंब होत आहे.
भाजप-मगो युतीचे समीकरण
भाजप आणि मगो युतीची अंतिम रूपरेषा ठरली असून मगोला मडकईच्या दोन आणि मांद्रेची एक जागा देण्यात आली. उर्वरित मतदारसंघांत मगो पक्ष उमेदवार देणार नाही. काही मतदारसंघांत अपक्ष उमेदवारांना देखील पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षाने घेतला, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. भाजपने यापूर्वीच १९ उमेदवार जाहीर केले असून, उर्वरित उमेदवारांची अंतिम यादी मंगळवारी जाहीर होईल. बुधवारपर्यंत सर्वच मतदारसंघांचे उमेदवार निश्चित होतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.
काँग्रेसमध्ये युतीवरून मतभेद
भाजप आणि ‘आप’चे उमेदवार जाहीर झाले असले तरी काँग्रेसचा निर्णय अद्याप झाला नाही. गोवा फॉरवर्ड आणि आरजीसोबत काँग्रेसची युतीबाबत चर्चा सुरू आहे. सोमवारी संध्याकाळी झालेल्या प्रदेश निवडणूक समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी युती आवश्यक असल्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले, मात्र काँग्रेसमधील काही जणांचा या युतीला विरोध असल्याने निर्णय घेणे कठीण झाले.
युतीसाठी गोवा फॉरवर्ड उत्सुक
जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेससोबत युती करण्यास गोवा फॉरवर्ड पक्ष उत्सुक असल्याचे पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले. ज्या मतदारसंघांमध्ये युतीबाबत चर्चा सुरू आहे, तेथील उमेदवारांची घोषणा नंतर करण्यात येईल, असे अमित पाटकर यांनी स्पष्ट केले.
विरोधकांवर टीका
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमुळे भाजपला प्रचारात मदत होईल. काँग्रेसने सत्तेत असताना केलेल्या चुकांचा फटका त्यांना बसत असून त्यांचा पराभव निश्चित आहे, असा टोला दामू नाईक यांनी लगावला.