पूजा नाईक कुटुंबियांच्या खात्यांतून पाच वर्षांत आठ कोटींचे व्यवहार

पोलीस अधीक्षक : मंत्री, अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप तथ्यहीन


02nd December, 11:48 pm
पूजा नाईक कुटुंबियांच्या खात्यांतून पाच वर्षांत आठ कोटींचे व्यवहार

पत्रकार परिषदेत माहिती देताना गुन्हा विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पूजा नाईक व तिच्या कुटुंंबियांच्या बँक खात्यांतून २०१९ ते २०२४ या ५ वर्षांत ८.०६ कोटी रुपयांचे अार्थिक व्यवहार झाले आहेत. मंंत्री वा अधिकाऱ्यांंसोबत आर्थिक व्यवहार झाल्याचे कोणतेच पुरावे नाहीत. पूजा नाईक हिने केलेले आरोप तथ्यहीन आहेत, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती गुन्हा विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
सरकारी नोकरीसाठी पैसे दिल्याच्या प्रकरणातील संंशयित पूजा नाईक हिने दोन अधिकाऱ्यांंना पैसे दिल्याचा आरोप केला होता. पर्वरीमधील एका फ्लॅटमध्ये पैशांचे व्यवहार केल्याचे तिने म्हटले होते. तिने केलेल्या सर्व आरोपांंविषयी गुन्हे विभागाने तपास केला. तिचे आरोप तथ्यहीन असल्याचे सिद्ध झाले आहे, असे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांना पैसे दिल्याच्या आरोपाची चौकशी करताना पोलिसांनी पूजाच्या कुटुंबियांच्या बँक खात्यांचा सखोल तपास केला. पूजाच्या खात्यातून मागील पाच वर्षांत ३.५४ कोटींचे व्यवहार झाले आहेत. तिचा पती पुरुषोत्तम यांच्या खात्यातून ४.३९ कोटींचा, तर दोन्ही मुलींच्या खात्यांतून १३.१८ लाखांचे व्यवहार झाले आहेत. कुटुंबियांच्या खात्यांतून एकूण ८.०६ कोटींचे व्यवहार झाले आहेत. पूजाने आलिशान वाहने घेतली आणि चैनीवर पैसे खर्च केले. तिच्याकडे सहा आलिशान गाड्या आणि ३ जेसीबी आहेत. मंंडूर, तिसवाडी येथे घर बांधण्यासाठी ४५ लाख, बेतकी-फोंडा येथील घरावर ४५ लाख, डोंगरी येथे मंडप बांधण्यासाठी १५ लाख रुपये तिने खर्च केले आहेत. पूजा आणि तिच्या पतीने मिळून १ कोटींचे सोने विकले आहे.
पूजाच्या आरोपांवर अधीक्षक राहुल गुप्ता म्हणाले...
२०१२ साली मगोच्या कार्यालयात काम केल्याचा दावा पूजाने केला असला तरी त्याबाबत पुरावा मिळालेला नाही. कार्यालयात हजेरीपटावर सही वा पगार घेतल्याचे सिद्ध झालेले नाही.
सरकारी नोकरीसाठी ६१३ जणांकडून पैसे घेतले आणि ते तन्वी नाईक हिच्याकडे दिल्याचे पूजा म्हणाली होती. तपासात मात्र तन्वी नाईक नावाची व्यक्ती आढळली नाही. तन्वी नाईकला आपण ओळखत नाही, असे पूजाने चौकशीवेळी सांगितले.
पीडीए कॉलनी, पर्वरी येथील फ्लॅटमध्ये खासगी कार्यालय होते. तेथेच आर्थिक व्यवहार झाले, असे पूजाचे म्हणणे होते. पीडीए कॉलनीतील फ्लॅट आयएचएमच्या विद्यार्थ्यांना भाड्याने दिला आहे. तो फ्लॅट सरकारी कार्यालयासाठी कधीच दिला नव्हता, असे फ्लॅटच्या मालकाने सांगितले.
पैसे दिल्याविषयीच्या क्लिप्स मोबाईलमध्ये असल्याचे पूजा म्हणाली होती. तो फोन सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथून ताब्यात घेतला आहे. हा फोन पूजाच्या पतीने दर्शन कोरगावकर यांना विकला होता. दर्शनने तो सहारनपूरच्या सुमित कुमार यांना विकला होता. तो फोन आता म्हार्दोळ पोलिसांच्या ताब्यात आहे.
पूजाच्या विरोधात पाच गुन्ह्यांची नोंद झाली आहे. म्हार्दोळ पोलिसांत नोंद झालेले गुन्हे गुन्हा विभागाकडे वर्ग केला आहे. पूजा नाईकविरोधात तक्रारी असतील तर गुन्हे शाखेशी संपर्क साधावा.


पूजा नाईकचे आरोप बिनबुडाचे : मुख्यमंत्री

पूजा नाईक हिने केलेल्या आरोपांवर गुन्हा शाखेने सखोल चौकशी करून अहवाल तयार केला आहे. मी अहवाल वाचला असून पूजा नाईकने केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. गुन्हा शाखेने आरोपातील प्रत्येक बाबीची चौकशी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरूच राहणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुन्हा शाखेच्या चौकशी अहवालावर म्हटले आहे.