जि.पं. निवडणूक : विरोधकांची आघाडी होण्याची शक्यता धुसर

काँग्रेसची पहिली यादी जाहीर : आरजीचा विश्वासघाताचा आरोप


02nd December, 11:53 pm
जि.पं. निवडणूक : विरोधकांची आघाडी होण्याची शक्यता धुसर

पत्रकारांशी बोलताना आरजीप्रमुख मनोज परब. सोबत आमदार वीरेश बोरकर व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आधी गोवा फॉरवर्ड आणि आता काँग्रेसने आघाडीबाबत बोलणी सुरू असतानाच उमेदवारांची घोषणा केल्याने आरजीपी (रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टी) अस्वस्थ झाली आहे. विशेष म्हणजे ज्या मतदारसंघांत आरजीपीने दावा केला होता, त्याच मतदारसंघांत काँग्रेसने उमेदवार जाहीर केला आहे. गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसकडून आरजीपीला एकप्रकारे ‘चेकमेट’ मिळाला आहे. त्यामुळे जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस, आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड यांची आघाडी होण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात आली आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसने उत्तर गोव्यातील ७ आणि दक्षिण गोव्यातील ४, अशा एकूण ११ मतदारसंघांतील उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी जाहीर केली. यानंतर आरजीपीचे प्रमुख मनोज परब यांनी काँग्रेस पक्षाने विश्वासघात केल्याचा आरोप केला. ते पुढे म्हणाले, मतदान १५ दिवसांवर येऊन ठेपले आहे. आमचा पक्ष दारोदार जाऊन प्रचार करतो. आमचा पक्ष आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. त्यामुळे काँग्रेसने केलेली राजकीय फसवणूक मारक ठरते. आम्ही आमच्या मागण्या, आम्हाला हवे असलेले मतदारसंघ महिन्याभरापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांना सांगितले होते. त्यावेळी आम्ही चर्चेला बसल्यानंतर तडजोड करण्याची तयारीही दाखविली होती.
आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर म्हणाले, सोमवारपर्यंत आमची बोलणी सुरू होती. बोलणी पूर्ण झाल्याशिवाय उमेदवार जाहीर करायचे नाहीत, असे ठरले होते. तरीदेखील काँग्रेसने उमेदवार जाहीर केले. हे योग्य नाही.
युती झाल्यास काँग्रेसपेक्षा आरजी व गोवा फॉरवर्डला अधिक फायदा होईल, म्हणून आघाडीला काही काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध आहे. कार्यकर्त्यांचा विरोध असूनही भाजपला हरवण्यासाठी प्रादेशिक पक्षांशी आघाडी करण्याची तयारी नेत्यांनी दाखवली आहे. जागांविषयी एकमत होत नसल्याने अखेर ही आघाडी होण्याची शक्यता धुसर बनली आहे.

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीला वेग दिला आहे. भारजपने सोमवारी मगोसोबत युती जाहीर करतानाच १९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. मंगळवारी १० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. ‘आप’ने २९ उमेदवार जाहीर केले आहेत.
आम्ही आघाडी धर्म सोडलेला नाही : मनोज परब
आरजीला अंधारात ठेवून उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने विश्वासघात केला आहे. ज्या जागा आरजीने मागितल्या होत्या, त्या जागांवर काँग्रेसने उमेदवार जाहीर केले. मागील अनेक दिवस आम्ही आघाडी धर्म पाळून चर्चा करत होतो. आम्ही आघाडी धर्म सोडलेला नाही. आघाडी तुटली तर त्याला आरजी जबाबदार राहणार नाही, असे आरजी प्रमुख मनोज परब यांनी म्हटले आहे.


जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप विरोधात काँग्रेस, आरजी व गोवा फॉरवर्ड यांच्या आघाडीसाठी सुरुवातीला मीच पुढाकार घेतला होता. गेल्या दोन दिवसांत आरजी - काँग्रेस यांच्यामध्येच चर्चा सुरू होती. त्यांचे का व कुठे फिसकटले याबद्दल मला काहीच माहिती नाही. बरीच चर्चा होऊनही जागावाटपाबाबत एकमत झालेले नाही. पहिल्या बैठकीत काँग्रेसला ३०, आरजीला १० व गोवा फॉरवर्डला १० जागा देण्याचे ठरले होते.
_ विजय सरदेसाई, अध्यक्ष, गोवा फॉरवर्ड            

हेही वाचा