‘मोपा’वरून दोन मिनिटांत ​प्रवासी न नेल्यास टॅक्सीला १८० रुपये शुल्क

टॅक्सी चालकांचे आंदोलन : शुल्क आकारणी स्थगित ठेवल्याने तूर्त तणाव निवळला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11 hours ago
‘मोपा’वरून दोन मिनिटांत ​प्रवासी न नेल्यास टॅक्सीला १८० रुपये शुल्क

पेडणे : मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन मिनिटांच्या आत प्रवासी न नेल्यास अतिरिक्त १८० रुपयांची फी आकारण्याचा निर्णय जीएमआर कंपनीने अचानक लागू केला. या निर्णयाचा निषेध करत स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी बुधवारी आकस्मिक आंदोलन केले. परिस्थिती तणावपूर्ण झाली असून, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलनामुळे विमानतळ परिसरात टॅक्सींच्या मोठ्या रांगा लागल्या. प्रवाशांनाही वाहन मिळण्यात अडचणी आल्या. काही तासांच्या चर्चेनंतर विमानतळ अधिकाऱ्यांनी हा नवा नियम तात्पुरता स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि आंदोलनही थांबवण्यात आले.
विमानतळावर प्रवाशांना घेण्यासाठी किंवा सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी फक्त दोन मिनिटांची मोफत पार्किंगची मर्यादा ठेवण्यात आली आहे. दोन मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबणाऱ्या वाहनांना १८० रुपये दंड आकारला जात असल्याची नोटीस बोर्डावर लावण्यात आली.
या अचानक झालेल्या अंमलबजावणीचा विरोध स्थानिक टॅक्सी चालकांनी जोरदार केला. त्यांच्या मते, या निर्णयामुळे प्रवाशांना आणि टॅक्सी चालकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी सांगितले की मोपा विमानतळासाठी त्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी गेल्या असूनही अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. जमीन दिल्यानंतर किमान आमचा टॅक्सी व्यवसाय तरी सुरळीत चालू द्यावा, पण जीएमआर कंपनी सतत छळ करत आहे, असा आरोप टॅक्सी चालकांनी केला. अचानक आणलेल्या नियमामुळे संपूर्ण टर्मिनल परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अनेक प्रवाशांना टॅक्सी मिळण्यात वेळ लागला, नियोजित वेळेत स्थळी पोहोचण्यास अडचणी आल्या.
समस्यांचा डोंगर वाढताच
मोपा विमानतळ सुरू झाल्यापासून टॅक्सी व्यावसायिकांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढत असल्याचा दावाही त्यांनी केला. टॅक्सी व्यावसायिकांनी यापूर्वीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार जीत आरोलकर आणि वाहतूक मंत्री माॅविन गुदिन्हो यांची भेट घेऊन समस्या मांडल्या होत्या. परंतु त्यावर अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही. आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा टॅक्सी व्यावसायिकांनी दिला आहे.      

हेही वाचा