कॉन्ट्रॅक्टर, पीडब्ल्यूडी यांच्या कचाट्यात कला अकादमीची इमारत

आयआयटी मद्रासच्या अहवालावर भवितव्य अवलंबून


10 hours ago
कॉन्ट्रॅक्टर, पीडब्ल्यूडी यांच्या कचाट्यात कला अकादमीची इमारत

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्य सरकारतर्फे कला अकादमीच्या दुरुस्ती आणि आधुनिकीकरणासाठी स्थापन केलेल्या कृती दलाची (टास्क फोर्स) बैठक १२ किंवा १३ डिसेंबर रोजी होणार आहे. कृती दल आपला अंतिम अहवाल सरकारकडे सुपूर्द करणार आहे. ज्येष्ठ कलाकार विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल काम करत आहे. याच कृती दलाच्या देखरेखीखाली कला अकादमीच्या इमारत व दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची तपासणी करणाऱ्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मद्रासच्या पथकाने अंतिम तपासणी अहवाल आणि स्थिरता अहवाल दिल्यानंतर कृती दल पुढील निर्णय घेणार आहे. कृती दलाच्या यापूर्वी चार बैठका झाल्या आहेत.
कला अकादमीच्या इमारतीची दुरुस्ती केल्यानंतर काही दिवसांतच इमारतीला गळती लागली होती. संरचनात्मक, तसेच ऑडिटोरियमच्या तांत्रिक आधुनिकीकरणात दोष दिसू लागले होते. यामुळे कला अकदमीच्या केलेल्या दुरुस्ती कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. राज्यातील कलाकारांनी या विषयावरून आंदोलने केली. त्यांनी सरकारकडे कला अकादमीच्या दुरुस्तीकामाच्या चौकशीची मागणी केली. ही मागणी पूर्ण करताना राज्य सरकारने ज्येष्ठ नाट्यकलाकार विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना केली.
इमारतीबाबत आयआयटी मद्रासच्या शिफारसी
कृती दलाने कला अकादमीच्या इमारतीची तपासणी करण्याचे काम आयआयटी मद्रासच्या पथकाकडे सोपविले होते. या पाथकाने अहवालाद्वारे महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत. यात इमारतीत येणारे पाणी आणि त्यामुळे होणारे नुकसान, गंज धरण्याचा वाढता धोका, सूक्ष्म-काँक्रिटचा वापर टाळणे, इमारतीची सखोल दृश्य तपासणी करून संरचनेची विद्यमान स्थिती, दुरुस्तीचा आराखडा तयार करून इमारतीची तपशीलवार स्थिती अहवाल करण्याचा सल्ला दिला होता. आयआयटी मद्रासकडून अहवाल पूर्ण झाला असल्याने पुढील बैठकीत कृती दल आपला अहवाल सादर करणार आहे.
कंत्राटदाराची बिले न दिल्याने दुरुस्ती काम रखडले
आयआयटी मद्रासकडून स्टॅबिलिटी रिपोर्ट मिळत नाही, तोपर्यंत कृती दलामार्फत काम करणारी कन्सल्टन्सी दुरुस्ती कामाला सुरुवात करू शकत नाही. कला अकादमीत कंत्राटदाराकडून देखभाल कार्य व्यवस्थित होत नसल्याने नादुरुस्त वस्तू तशाच पडून आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने संबंधित कंत्राटदारांची बिले अदा केली नसल्याने कला अकादमीच्या इमारतीची दुरुस्तीची आणि डागडुजीची कामे प्रलंबित आहेत.

हेही वाचा