गोव्याच्या किनारपट्टीत ३३ किलोमीटरची वाढ

सुधारीत एकूण लांबी आता १९३ किलोमीटर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th December, 10:42 pm
गोव्याच्या किनारपट्टीत ३३ किलोमीटरची वाढ

पणजी : गोव्याच्या किनारपट्टीची सुधारीत लांबी आता १९३ किलोमीटर झाली आहे. जुन्या नोंदीपेक्षा यात ३३ किलोमीटरची वाढ झाली. या वाढीमुळे सीआरझेड नियमांवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेतील लिखित उत्तरात दिली.

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मोजमाप
भारताची किनारपट्टी पूर्वी ७,५१६ किलोमीटर मानली जात होती. मात्र, नव्या विश्लेषणानंतर ती ११,०९८ किलोमीटर असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रीय हायड्रोग्राफिक कार्यालयाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने हे पुनर्विश्लेषण केले. यासाठी आधुनिक जीआयएस सॉफ्टवेअर, अलीकडील सर्वेक्षणांचे आकडे आणि उच्च भरतीच्या रेषांचा डेटा वापरण्यात आला.

३३ किलोमीटरची वाढ
१९७० च्या सर्वेक्षणात गोव्याची किनारपट्टी १६० किलोमीटर असल्याची नोंद होती. २०२३ च्या नवीन विश्लेषणानुसार यात ३३ किलोमीटरची भर पडली. त्यामुळे राज्याची एकूण किनारपट्टी आता १९३ किलोमीटर झाली. किनारपट्टी संरक्षण आणि विकास सल्लागार समितीने देशातील सर्व राज्यांच्या या सुधारित लांबीला मान्यता दिली.

नियोजनासाठी होणार फायदा
किनारपट्टीच्या सुधारित मोजमापामुळे बंदरे, पायाभूत सुविधा आणि पर्यटन क्षेत्रातील विकासकामांचे नियोजन करणे अधिक सोपे होईल. तसेच चक्रीवादळे, जमिनीची धूप आणि समुद्री लाटा यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका ओळखून त्यासाठी सरकारी तयारी बळकट करण्यास मदत होईल.

सीआरझेडचे नियम कायम
किनारपट्टीची लांबी वाढली असली तरी त्याचा विद्यमान सीआरझेड नियमांवर कोणताही परिणाम होणार नाही. चेन्नईतील राष्ट्रीय शाश्वत किनारपट्टी व्यवस्थापन केंद्र उच्च भरती रेषेच्या आधारे मर्यादा निश्चित करते आणि तोच नियम पुढेही लागू राहील, असे मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.

#Goa #Coastline #CRZ #JitendraSingh #Environment #GoaNews #Geography
हेही वाचा