हप्त्याची संपूर्ण रक्कम सरकार भरणार

पणजी : राज्यातील पाडेली आणि रेंदेर यांना विम्याच्या हप्त्यासाठी आता एकाही पैशाचा खर्च करावा लागणार नाही. ९५६ रुपयांच्या विम्यामध्ये त्यांच्या वाट्याचे १४३ रुपयेदेखील आता सरकार भरणार आहे. यामुळे कोणताही खर्च न करता पाडेलींना ७ लाख रुपयांच्या अपघाती विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे. पाडेल्यांबरोबरच नारळ काढणी करणारे इतर कामगार यांनाही या योजनेचा लाभ उपलब्ध होईल.
७ लाखांचे सुरक्षा कवच
पाडेल्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणावर नारळ उत्पादन असल्याने पाडेल्यांची आवश्यकता भासते. झाडावरून पडून मृत्यू किंवा गंभीर जखमी होण्याच्या घटनांमुळे २०२३ साली ‘केअर सुरक्षा विमा योजना’ सुरू करण्यात आली. नारळ विकास महामंडळाने न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने ही योजना कार्यान्वित केली आहे. राज्यात १०६ नोंदणीकृत पाडेली आहेत.
अल्प प्रतिसादामुळे निर्णय
या विम्यासाठी वार्षिक ९५६ रुपये हप्ता निश्चित केला होता. त्यापैकी ८१३ रुपये (८५ टक्के) रक्कम नारळ विकास महामंडळ भरत होते. उरलेले १४३ रुपये (१५ टक्के) पाडेल्यांनी भरणे अपेक्षित होते. मात्र, या योजनेला पाडेल्यांकडून अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. १४३ रुपये भरण्यासाठीही कोणी पुढे आले नाही.
अधिसूचना जारी
योजनेला मिळणारा अल्प प्रतिसाद पाहून १४३ रुपयांची रक्कम सरकार स्वतः भरेल, असा निर्णय घेण्यात आला. याबाबतची अधिसूचना जारी झाली आहे. मात्र, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पाडेली आणि इतर पात्र कामगारांनी अर्ज करणे आवश्यक आहे, असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.