दोन्ही कार्यक्रम अनिवार्य : शिक्षकांतून नाराजी

प्रतिनिधी। गोवन वार्ता.
पणजी : राज्यात २० डिसेंबर रोजी जिल्हा पंचायतीसाठी मतदान होत आहे. निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आदले दिवशी संबंधित शिक्षकांना निवडणुकीसाठीचे आवश्यक साहित्य घेऊन दिलेले केंद्र गाठावे लागते. आदले दिवशी, १९ डिसेंबरला गोवा मुक्ती दिनाचा कार्यक्रम शाळेत करणे आवश्यक असते. एकशिक्षकी किंवा दोनच शिक्षक असलेल्या शाळांमधील शिक्षकांसमोर दोन्ही कार्यक्रमांचे नियोजन कसे करावे, हा प्रश्न उभा राहिला आहे.
जिल्हा पंचायत निवडणूक २० डिसेंबर रोजी होत आहे. आदल्या दिवशी, १९ डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन आहे. निवडणुकीच्या ड्युटीवर असलेल्या शिक्षकांनी १९ रोजी निवडणुकीसाठी आवश्यक साहित्य घेऊन दिलेल्या मतदान केंद्रावर जाणे अनिवार्य असते. एकशिक्षकी शाळेतील शिक्षकांना या दिवशी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मुक्ती दिनाचा कार्यक्रम करून त्यांना निवडणुकीच्या ड्युटीसाठी जावे लागणार आहे. शाळांमधील मुक्ती दिनाच्या कार्यक्रमाला महत्त्व द्यावे निवडणूक ड्युटीला, अशा द्विधा मनःस्थितीत ते अडकले आहेत.
राज्यातील काही सरकारी प्राथमिक शाळांमध्ये केवळ एकच किंवा दोनच शिक्षक कार्यरत आहेत. अशा स्थितीत १९ डिसेंबर रोजी सकाळी मुक्ती दिनाचा कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असते. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निवडणूक ड्युटीला हजर राहणेचे सक्तीचे असते. शिक्षकांमधून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. काही शिक्षकांचे म्हणणे आहे की, प्रत्येक निवडणुकीला शिक्षकांना वेठीस धरले जात आहे. अध्यापनाचे काम तरी आहेच शिवाय विविध सर्व्हे, एनईपीचे वर्ग, निवडणूक ड्युटी यांनाही जावे लागते. यामुळे आम्हाला येणाऱ्या अडचणींचा विचार होताना दिसत नाही. दरवर्षीच्या मुक्ती दिनाच्या कार्यक्रमाला महत्त्व दिले आणि निवडणुकीच्या ड्युटीला पोहोचण्यास उशीर झाला तर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असते. त्यामुळे शिक्षक दडपणात आहेत.
ज्या एकशिक्षकी सरकारी शाळेच्या शिक्षकाला जिल्हा पंचायत निवडणुकीच्या कामाला घातले आहे, त्यांनी याविषयी संबंधित साहाय्यक जिल्हा शिक्षक निरीक्षक (ए.डी.आय.) यांना कल्पना द्यावी. १९ डिसेंबर रोजी शाळेत होणाऱ्या मुक्ती दिनाच्या ध्वजारोहणासाठी इतर शिक्षक किंवा संबंधित खात्याच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू शकतात. मुक्ती दिनाच्या कार्यक्रमाचे अशा पद्धतीनेही नियोजन करता येते.
_ सीताराम नाईक, उपाध्यक्ष, राज्य शिक्षक संघ