विविध अपघातांत गोव्यातील चौघे ठार

सांकवाळ येथे १२ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th December, 08:39 pm
विविध अपघातांत गोव्यातील चौघे ठार

पणजी : राज्यभरात शनिवार हा घातवार ठरला. काणकोण चापोली धरण परिसरात झालेल्या अपघातात युवक ठार झाला. तर दोघे जण जखमी झाले. कोलवाळ येथे स्वयंअपघातात जखमी युवक ठार झाला. तर लोणावळा येथील अपघातात गोव्यातील दोघे पर्यटक युवक ठार झाले. सांकवाळ येथे युवकाने आत्महत्या केली.

लोणावळा येथील अपघातात गोव्यातील दोघे युवक ठार

लोणावळा येथे झालेल्या भीषण अपघातात गोव्यातील दोन पर्यटक युवक ठार झाले. अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे योगेश सुतार (२१ वर्षे) व मयूर वेंगुर्लेकर (२४ वर्षे) अशी आहेत. दोघेही म्हापसा येथील रहिवासी आहेत.  

अपघातात ठार झालेले युवक पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात पिकनिकसाठी गेलेल्या १४ जणांच्या गटातील होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातील कार लायन्स पॉइंटजवळ वळणावर जात होती. त्यावेळी भरधाव वेगाने येत असलेल्या ‌मिनी ट्रकला समोरून धडक बसली. धडक एवढी तीव्र होती की, कारच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला. दोघेही युवक गंभीर जखमी झाले व कारमध्ये अडकले.  

अपघाताचा आवाज ऐकून काही स्थानिक त्याठिकाणी आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. बचाव पथकाने येऊन दोन्ही युवकांना बाहेर काढले. मात्र, ते जागीच मृत्यू पावले होते. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शवचिकित्सा करून मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आले. लोणावळा पोलीस अपघाताचा अधिक तपास करीत आहेत. 


काणकोणात अपघातात कारचालक ठार

काणकोण :  येथील चापोली धरण परिसरात झालेल्या भीषण अपघातात रविश राजेंद्र कोमरपंत (२४ वर्षे, राजबाग, तारीर) हा युवक ठार झाला. दिव्या ठाकूर व रिक्षित राज (२७ वर्षे) गंभीर जखमी झाले. या दोघांवरही हॉस्पिटलात उपचार सुरू आहेत. 

रिक्षित व दिव्या ही दोघेही रविश यांच्या थार वाहनाने (केए ०४ एनजी ०१११) रात्री चापोली धरण परिसरात गेले होते. रस्त्यावर असलेल्या एका वळणावर मध्यरात्रीनंतर ३ वा. रविशचा गाडीवरील ताबा सुटला व बाजूच्या मोठ्या दगडाला धडक बसली. चालकाच्या बाजूचा गाडीचा टायर सुटला. अपघातात रविश जागीच ठार झाला. २७ वर्षीय र‌िक्षित राज व दिव्या ठाकूर दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. तेथून रिक्षितला उपचारासाठी गोमेकॉत पाठवण्यात आले. दिव्यावर मडगावातील दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. काणकोण पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. 

रक्षीत राज हा मूळ बंगळुरू, कर्नाटक येथील असून, राजबाग येथे एक हॉटेल भाड्याने चालवण्यासाठी घेतले आहे. त्याची मैत्रीण दिव्या मूळ गुजरात येथील आहे. रविश हा पर्यटक टॅक्सी मालक व चालक आहे. रविशच्या घरी त्याची आई एकटीच आहे. रविशच्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


कोलवाळ येथे स्वयंअपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू 

म्हापसा : मुशीरवाडा, कोलवाळ येथे वीज खांबला दुचाकीची धडक बसून झालेल्या स्वयंअपघातातील जखमी राकेश सुकांत सामल (२२, रा. करक्याचो व्हाळ, रेवोडा) या युवकाचा मृत्यू झाला.

अपघात शुक्रवारी ५ रोजी पहाटे ३.३० च्या सुमारास घडला होता. राकेश हा हणजूणहून रेवोडा येथे जीए ०३ बीडी ७०८४ क्रमांकाच्या फसिनो स्कुटरवरून घरी जात होता. मुशीरवाडा कोलवाळ येथील कनिष्ठ वीज अभियंता कार्यालयाजवळ भरधाव दुचाकीने रस्त्याच्या कडेच्या वीज खांबाला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार वीज खांब आणि दुचाकीमध्ये चिरडला गेला.  

घटनेवेळी मागून येणार्‍या एका दुचाकीस्वाराच्या नजरेस हा अपघात पडला. त्याने काही अंतरावर राम मंदिर जवळ नाकाबंदीसाठी तैनात असलेल्या पोलिसांना अपघाताची कल्पना दिली. त्यानंतर कोलवाळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी जखमी राकेश सामल याला रूग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले असता त्याला लगेच गोमेकॉत पाठवण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना शनिवारी ६ रोजी पहाटे त्याचे निधन झाले.

अपघाताचा पंचनामा कोलवाळ पोलीस उपनिरीक्षक विष्णू जाधव व हवालदार महादेव परब यांनी केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

विद्यार्थ्याची आत्महत्या

परीक्षेच्या निकालाच्या भीतीने सांकवाळ येथील राहत्या घरी सहावीतील १२ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून वास्को परिसरातील संबंधित शाळेतील शिक्षकांचा जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा