मेरशीत एशियन पेंटच्या आडून दारू तस्करीचा पर्दाफाश

ट्रक चालकाला अटक : एक कोटींची भेसळयुक्त दारू जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
8 mins ago
मेरशीत एशियन पेंटच्या आडून दारू तस्करीचा पर्दाफाश

म्हापसा : एशियन पेंटच्या नावाखाली गोव्यातून बेळगावमध्ये होणार्‍या भेसळयुक्त दारू तस्करीचा गुन्हा शाखेने पदार्फाश करीत सुमारे १ कोटी रुपयांची बनावट दारू मेरशी येथे जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक हुसेन साब मुल्ला (३५, रा. बिजापूर कर्नाटक) याला अटक केली.

पोलिसांनी ही कारवाई शनिवारी दुपारी मेरशी येथे जुने गोवे बायपास रस्त्यावर केली. गुन्हा शाखेला गोव्यातून बेळगावकडे भेसळयुक्त दारू घेऊन ट्रक जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला व एमएच १० सीआर १८३९ क्रमांकाच्या ट्रकला अडवले.

या ट्रकच्या मागच्या बाजूने एशियन पेंटच्या पिशव्या ठेवल्या होत्या. या पिशव्यांच्या आडून ही दारू तस्करी केली जात होती. झडतीवेळी ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या पेट्या असल्याचे पोलीस पथकाला दिसून आले. यात जवळपास १,४९८ विविध ब्रॅण्डच्या दारूच्या पेट्या सापडल्या. त्यामध्ये सुमारे ४८ हजार दारुच्या बाटल्या होत्या. ही सर्व दारू तसेच २५ किलोच्या अशियन पेंटच्या ३५ पिशव्या, मोबाईल फोन व इतर साहित्य मिळून पोलिसांनी १ कोटी रुपयांचा माल हस्तगत केला.

संबंधित अधिकार्‍यांकडून आवश्यक परवानगी न घेता आणि सरकारला आवश्यक शुल्क न भरता संसर्गजन्य रोग पसरवू शकणारी तसेच मानवी जीवनाला धोका निर्माण करणारी भेसळयुक्त दारूची अज्ञात ठिकाणी मानवी वापरासाठी तस्करी करण्याबरोबरच सरकारची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा शाखेने याप्रकरणी भा.न्या.सं.च्या कलम १२५, २७४, ३१८(४), ३३५, ३३६ (२), ३३६ (३), ३४० (२), तसेच गोवा, दमण आणि दीव उत्पादन शुल्क कायदा कलम ३० (अ) व (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक लक्षी आमोणकर हे करीत आहेत.

दरम्यान, गुन्हा शाखेने काही दिवसांपूर्वी दारू तस्करी संदर्भात अशीच कारवाई करत चार जणांना अटक केली होती. संशयितांकडून टाटा आयशर ट्रकसह दीड कोटी रुपयांची दारू जप्त केली होती.

हेही वाचा