रोख ५० हजार रुपये चोराने केले लंपास

पेडणे : तुये-पार्से या मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या अनिल सामंत यांच्या घरात मंगळवारी भरदिवसा चोरी झाली होती. चोराने रोख ५० हजार रुपये तसेच कपाटातील सोन्याचे दागिने असा चार लाखांचा मुद्देमाल पळविला होता. मात्र बुधवारी सोन्याचे दागिने सावंत कुटुंबियांना घरातच इतरत्र सापडले.
पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक नितीन हळर्णकर यांच्याशी संपर्क साधला असता, चोराने फक्त रोख रक्कम पळविल्याचे त्यांनी सांगितले. सामंत कुटुंबियांनी सोन्याचे दागिने घरातच इतरत्र ठेवले होते. ते चोरांना सापडले नाहीत. सुरुवातीला चोरीचा प्रकार ध्यानात येताच सामंत कुटुंबियांना जबर धक्का बसला. रोख रकमेसह सोन्याचे दागिनेही चोरीस गेल्याची त्यांची भावना झाली. त्यानंतर घरातील सदस्यांनी अन्य ठिकाणी शोधाशोध केली असता, कपाटातील कपड्यांमध्ये दागिने सापडले. त्यामुळे चोराने ५० हजार रुपये रोख रक्कम पळवल्याचे स्पष्ट झाले.