पणजी मार्केटमध्ये थरार, कारचालक पोलिसांच्या ताब्यात

पणजी : कार (car) मागे घेत असताना (revers एक्सलेटर (accelerator) जोरात दाबल्यामुळे कारचालकाने एका दुकानाला धडक दिली. यावेळी एक पादचारी चिरडल्याने गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी बांबोळी येथील जीएमसीत (GMC Bambolim) दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता पणजीतील मार्केट (accident in Panjim Market) परिसरात हा अपघात घडला. कारचालक दारूच्या नशेत असल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले. त्याला पणजी पोलिसांनी ताब्यात घेतले हाेते.

मंगळवारी सकाळी एक १८ वर्षीय मद्यधुंद कारचालक आपल्या कामगारांना पणजी मार्केट परिसरात सोडण्यासाठी आला होता. तेथून जात असताना आधी त्याच्या कारने एका दुचाकीला धडक दिली. त्यावेळी तेथे काही जण जमले. त्यांना पाहून कारचालक युवकाने गाडी मागे घेण्यासाठी रिव्हर्स गियर टाकला. मात्र एक्सलेटर जोरात दाबल्यामुळे कोणाच्याही ध्यानीमनी नसताना कार वेगाने मागे सरकली आणि फुटपाथवर चढून एका बंद दुकानाच्या गाळ्याला कारने धडक दिली. त्याचवेळी तेथून जाणारा एक पादचारी कारच्या मागे सापडून गंभीर जखमी झाला. कारने धडक देताच कारची मागची काच फुटून तेथील हॉटेलच्या काऊंटरवर काचेचे तुकडे पसरले.

यावेळी उपस्थित लोकांनी कारचालकाला पकडून ठेवले आणि पोलिसांना बोलावले. दरम्यान, जखमी युवकाला उपचारांसाठी बांबोळी येथील जीएमसीत दाखल करण्यात आले. त्याच्या मांड्या तसेच गुढग्याला गंभीर इजा झाली आहे. कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी नेले. कारच्या धडकेने काही दुचाकींचेही नुकसान झाले.