तुये-पार्से रस्त्यालगतच्या घरातून भरदिवसा चार लाखांचा ऐवज लंपास

५०,००० रुपये रोख रकमेसह तीन सोनसाखळ्या, सोन्याच्या पानाची चाेरी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd December, 09:32 pm
तुये-पार्से रस्त्यालगतच्या घरातून भरदिवसा चार लाखांचा ऐवज लंपास

पेडणे : तुये-पार्से मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या अनिल श्रीधर सावंत यांच्या घरात भरदिवसा झालेल्या चोरीच्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. चोरांनी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत कोणीही नसल्याची संधी साधत घरातील तिजोरी फोडून तब्बल चार लाखांचा ऐवज पळवला.

तिजोरी फोडण्यासाठी नारळ सोलण्याच्या सुळक्याचा वापर

चोरी झाली त्यावेळी घर पूर्णपणे रिकामे होते. चोराने ओसरीत ठेवलेल्या नारळ सोलण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुळक्याचा वापर करून तिजोरी फोडली. तिजोरीत ठेवलेल्या तीन सोन्याच्या साखळ्या, सोन्याचे पान तसेच मिलेरमध्ये ठेवलेले १५ हजार रुपये आणि तिजोरीतील ३५ हजार रुपये असा एकूण चार लाखांचा ऐवज चोराने लंपास केला.

मेहुण्यामुळे चोरीचा प्रकार उघड

या घराच्या अगदी रस्त्यालगत अनिल सावंत यांचे मेहुणे यंत्राद्वारे कुरण कापण्याचे काम करत होते. दुपारी एक वाजता तो आपले यंत्र घराकडे ठेवण्यासाठी गेला असता मुख्य दरवाजाला कुलूप नसून आतून कडी लावलेली असल्याचे त्याला जाणवले. संशय आल्याने त्याने तातडीने सावंत यांना कळवले. घरात प्रवेश केल्यावर मागच्या दारातून चोर पळाल्याचे दिसून आले.

पोलिसांकडून पंचनामा; वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट

चोरीची माहिती मिळताच पेडणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत तपासाला सुरुवात झाली. पेडणे तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सलीम शेख यांनीही पथकासह घटनास्थळी येऊन सावंत कुटुंबीयांकडे सविस्तर चौकशी केली.


मोठे नुकसान टळले

चोरीपूर्वीच सावंत यांच्या पत्नीने काही महत्त्वाचे सोन्याचे दागिने जवळच असलेल्या पार्से-चावदेवाडा येथील माहेरी सुरक्षित ठेवल्याने, चोरट्यांच्या हाती मोठ्या प्रमाणावर दागिने लागू शकले नाहीत. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान टळले.

बिगर गोमंतकीयांबाबत स्थानिकांमध्ये चर्चा

या परिसरात, विशेषतः चोरी झालेल्या घराच्या रस्त्यालगत, मोठ्या प्रमाणात बिगर गोमंतकीय वास्तव्य करत असल्याची माहिती समोर येत आहे. ते कुठून येतात, कुठे जातात, त्यांच्याकडे ओळखपत्र आहे की नाही, याचा पोलिसांकडे पुरेसा तपशील आहे का? हा मुद्दा स्थानिकांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा