जेनिटो कार्दोझवरील हल्लाप्रकरणी दोघांची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगित

सत्र न्यायालयाने ठोठावली होती चार वर्षांची सश्रम सक्तमजुरी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
जेनिटो कार्दोझवरील हल्लाप्रकरणी दोघांची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगित

पणजी : शिरदोण समुद्रकिनाऱ्यावर २००९ मध्ये सराईत गुंड जेनिटो कार्दोझ याच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणात सत्र न्यायालयाने संशयित सचिन पाडगावकर आणि प्रसाद कुबल या दोघांना सुनावण्यात आलेली चार वर्षांची सश्रम सक्तमजुरी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. तर, ही शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने स्थगित ठेवली आहे.

शिरदोण समुद्रकिनाऱ्यावर खुनाची घटना १० मे २००९ रोजी घडली होती. जेनिटो कार्दोझ व त्याचे सहकारी महावीर नाडर, डॉम्निक नाझारेथ यांचा प्रतिस्पर्धी मिरांड टोळीशी वाद झाला. यावेळी दोन्ही गटांतील सदस्यांनी एका शॅकजवळ एकमेकांवर काचेच्या बाटल्या आणि चाकूने हल्ला केला होता. या टोळीयुद्धात दुसऱ्या टोळीचे सदस्य संतोष कालेल आणि फ्रान्सिस मॅन्युएल डिसोझा ऊर्फ मिरांड यांचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणात जेनिटो कार्दोझ व इतरांवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला होता. म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरवले आणि तीन वर्षांची सक्तमजुरी ठोठावली. ही शिक्षा गोवास्थित उच्च न्यायालयाने कायम ठेवली. त्याला जेनिटोने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने शिक्षा स्थगित ठेवली.

तर, त्यावेळी मिरांड याच्या टोळीतील संशयित सचिन पाडगावकर आणि प्रसाद कुबल व इतरांनी जेनिटो कार्दोझ याच्यावर हल्ला केल्या प्रकरणात सत्र न्यायालयाने चार वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. ही शिक्षा गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. या शिक्षेला संशयित सचिन पाडगावकर आणि प्रसाद कुबल या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असता, न्यायालयाने वरील शिक्षा स्थगित ठेवली. संशयितातर्फे अॅड. रोहन देसाई यांच्यासह अॅड. प्रणव पाठक, दीपक जोशी, संजय शर्मा आणि शिवम यादव यांनी युक्तिवाद मांडला.

न्या. संजय करोल आणि न्या. नोंगमीकापम कोतीश्वर सिंग यांच्या द्विसदस्यीय न्यायपीठाने हा आदेश दिला. 

हेही वाचा