शॉक लागून महिलेचा मृत्यू; घातपाताचा संशय व्यक्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
शॉक लागून महिलेचा मृत्यू; घातपाताचा संशय व्यक्त

डिचोली : कारापूर येथे वासंती रामा सालेलकर (वय ५०) या महिलेचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. स्वतःच्या घरातच त्यांना शॉक बसल्याची माहिती मिळते. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वासंती यांच्याकडे सुमारे ५२ हजार चौरस मीटर जमीन आहे. ही जमीन बळकावण्याचा प्रयत्न काही लोक करत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्या परिसरात झाडे तोडणे, जेसीबीने काम करणे याविरोधात त्यांनी तक्रारी केल्या होत्या. यापूर्वी त्यांच्यावर तीन वेळा हल्लेही झाले होते. एकदा चाकूने, तर एकदा लोखंडी रॉड त्यांच्या पायावर मारून त्यांना जखमी करण्यात आले. त्यामुळे त्यांनी काही एनजीओंकडून मदत मागितली होती. या प्रकरणी न्यायालयात केसही सुरू असून १० तारखेला सुनावणी होती, असेही कुटुंबीयांनी सांगितले.

गावातील लोकांकडेही वासंती यांनी जीवितास धोका असल्याचे सांगून मदत मागितली होती. एकदा त्यांनी पाणी वापरत असताना कोणी तरी विहिरीत विजेच्या तारा टाकल्याचा प्रकारही घडल्याचे समजते. त्यानंतर त्या विहिरीवरील पाण्याचा वापर बंद केला होता, अशी माहिती काहींनी दिली.

त्यांच्या जमिनीच्या वादाचा आणि त्यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का? असा प्रश्न अॅड. अजय प्रभुगांवकर यांनी उपस्थित केला आहे.

डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंद घराच्या लोखंडी दरवाजातून एक वीजवाहिनी गेली होती. वीजपुरवठा सुरू असताना वासंती यांनी दरवाजा उघडताच ती वायर त्यांच्या संपर्कात आली आणि त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्वरित त्यांना रुग्णवाहिकेतून साखळी येथील रुग्णालयात नेले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

घटनेच्या वेळी वासंती यांची बहीण साखळीला गेली होती. पोलिसांनी डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपास सुरू केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय राणे यांनी दिली.

हेही वाचा