प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हवेबाबत अहवाल समाधानकारक

एक्यूआय १००च्या खाली असल्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाची माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हवेबाबत अहवाल समाधानकारक

पणजी : पर्वरी उड्डाणपुलाजवळ हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. मात्र, राज्यातील हवेचे प्रदूषण एकूणच समाधानकारक असल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) १०० च्यावर गेल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो; परंतु पर्वरी परिसरातील एक्यूआय १०० च्या खाली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष लेव्हिन्सन मार्टिन यांनी दिली.

राज्यात पणजी, म्हापसा, फोंडा, मडगाव, अस्नोडा, आमोणा, डिचोली, होंडा, उसगाव, कोडली, सांगे, तिळामोळ, कुडचडे या शहरांमध्ये यंत्रणांद्वारे एक्यूआयची नियमित तपासणी केली जाते. तसेच कुंकळ्ळी, कुंडई, तुये यांसारख्या औद्योगिक वसाहतींमध्येही एक्यूआय मोजला जातो. गेल्या सात महिन्यांत एकदाही एक्यूआय १०० च्यावर गेला नसल्याचे अध्यक्ष मार्टिन यांनी सांगितले.

एक्यूआय ० ते ५० दरम्यान असल्यास कोणालाही त्रास होत नाही. ५१ ते १०० दरम्यान असल्यास केवळ दुय्यम आजार असलेल्या व्यक्तींना किरकोळ श्वसनाचा त्रास जाणवू शकतो; परंतु सामान्य लोकांना कोणताही त्रास होत नाही. एक्यूआय १०१ ते २०० दरम्यान गेल्यास लहान मुले आणि वृद्धांना श्वास घेताना अडचण निर्माण होऊ शकते.

पणजी आणि परिसरातील एक्यूआय ८१ ते ८४ दरम्यान असून हे समाधानकारक आणि सुरक्षित मानले जाते. धूळ किंवा धूर तोंडात किंवा नाकात गेल्यास कोणालाही क्षणिक त्रास होऊ शकतो; मात्र एकूणच एक्यूआयचे प्रमाण सामान्य मर्यादेत असल्याचे मार्टिन यांनी स्पष्ट केले. हवेतील नायट्रोजन आणि सल्फर डायऑक्साइड सारख्या वायूंचीही नियमित मोजणी केली जाते.

हेही वाचा