डॉक्टरांच्या पॅनलमार्फत गुरुवारी मृतदेहाची उत्तरीय तपासणी

डिचोली : कोळशेकातर कारापूर येथे विजेचा झटका लागून संशयास्पदरित्या मृत पावलेल्या वासंती सालेलकर (vasanti salelkar) यांच्या मृतदेहाची शवचिकित्सा एका डॉक्टरकडून न होता डॉक्टरांच्या पॅनलमार्फत व्हावी, अशी मागणी वासंती हिचे नातेवाईक व समाजसेवकांकडून करण्यात आली. या मागणीनंतर दि. ४ डिसेंबर रोजी डॉक्टरांच्या पॅनलमार्फत तिच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी होणार आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत डिचोली पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. ‘प्रकरण सर्व बाजूंनी तपासले जात असून कोणतीही हयगय केली जाणार नाही,’ असे पोलीस उपअधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी यांनी सांगितले.
घटना घडताच पोलिसांनी सखोल पंचनामा केला. त्यानंतर वीज विभागाच्या अभियंत्यांना झटका कसा लागला याची कारणमीमांसा करण्यासाठी बोलावण्यात आले. श्वानपथक व विशेष फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने घराची तपासणी करण्यात आली. ३ डिसेंबर रोजी पोलीस उपअधीक्षकांनी संपूर्ण घराची पाहणी करून कुटुंबीयांशी संवाद साधला.
मागील काही महिन्यांपासून वासंती यांच्यावर दोन–तीन वेळा जीवघेणे हल्ले झाले होते. त्यांनी वापरत असलेल्या विहिरीत अज्ञातांनी विष टाकण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मृत्यू नैसर्गिक नसल्याचा दावा अॅड. अजय प्रभुगावकर, गाकुवेध फेडरेशनचे उपाध्यक्ष रामकृष्ण जल्मी आणि सालेलकर कुटुंबीयांनी केला आहे. त्यांनी प्रकरणाची सखोल, निर्भीड चौकशी पोलीस किंवा आवश्यक असल्यास विशेष तपास पथक (एसआयटी) अथवा सीबीआयमार्फत व्हावी, अशी मागणी केली आहे.
कुटुंबीयांच्या निवेदनानुसार, एका डॉक्टरांऐवजी पाच डॉक्टरांच्या पॅनलकडून शवचिकित्सा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शवचिकित्सा अहवालातून वासंती सालेलकर यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मालमत्तेवरील वाद आणि घातपाताची शंका
वासंती सालेलकर या न्यायप्रविष्ठ मालमत्तेत एकट्याच राहत होत्या. त्या मालमत्तेबाबत न्यायालयीन वाद सुरू होता आणि १० डिसेंबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार होती. त्याआधीच त्या मृतावस्थेत आढळल्याने घातपाताचा संशय कुटुंबीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.