दोघांनाही सहा दिवसांची पोलीस कोठडी

म्हापसा : लोबोवाडो थिवी येथील फिर्यादी चंद्रकांत गाड यांच्या घरात झालेल्या १.८५ कोटी रुपयांच्या चोरी प्रकरणी कमलेश सथालिया उर्फ जस्टीन (रा. गिरी बार्देश व मूळ गुजरात) याला अटक केली. मुख्य संशयित कबीर महावीर प्रधान (रा. बागा-कळंगुट व मूळ झारखंड) याचा कमलेश हा साथीदार आहे.
या चोरी प्रकरणी फिर्यादी गाड यांनी सोमवार, १ डिसेंबर रोजी कोलवाळ पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी त्याच दिवशी संशयित आरोपी कबीर प्रधान याला अटक केली होती. तर, मंगळवारी रात्री कमलेश सथालिया याला पोलिसांनी पकडून अटक केली. दोन्ही संशयित आरोपींना डिचोली प्रथमश्रेणी न्यायालयाने सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
संशयित आरोपींनी फिर्यादींचे घर फोडून आत ठेवलेली १ कोटी ८५ लाख रूपये रोख रक्कम लंपास केली होती. गाड कुटुंबियांना चौकशीवेळी ही चोरी तक्रारदारांच्या नातीचा मित्र कबीर प्रधान याने आपल्या साथीदारासह केल्याचे उघडकीस आल्यावर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.
फिर्यादीच्या नातीसोबत संशयित आरोपी हा अधूनमधून घरी येत होता. त्याला घरात मोठी रक्कम असल्याची माहिती होती. त्यानंतर फिर्यादी कुटुंबीय घराबाहेर असल्याची संधी साधून संशयिताने ही चोरी केली होती.
पोलिसांनी चोरीच्या रकमेतील ७ लाख ४६ हजार रुपये रक्कम जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश घाडी हे करीत आहेत.