थिवीतील घरफोडीचा छडा : संशयित युवकाला कोलवाळ पोलिसांकडून अटक

पणजी : नातीच्या मित्रानेच घरात चोरी करत पावणे दोन कोटी रोख रकमेवर डल्ला मारण्याचा प्रकार थिवी (बार्देश) येथे घडला आहे. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी कबीर प्रधान (रा. बागा-कळंगुट) या मूळ पूर्व भारतातील युवकाला अटक केली आहे. तर, फरार झालेला कमलेश (रा. गिरी) याचा शोध पोलीस घेत आहेत.
चोरीची घटना ८-१० दिवसांपूर्वी घडली होती. तर, चोरीचा हा प्रकार उघडकीस आल्यावर याप्रकरणी सोमवार, १ डिसेंबर रोजी घरमालक चंद्रकांत गाड यांनी पोलिसांत तक्रार दिली. घरात ठेवलेली १ कोटी ८५ लाख रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे फिर्यादींच्या निदर्शनास आले. चौकशीवेळी ही चोरी तक्रारदारांच्या नातीच्या मित्राने केल्याचे आढळून आले.
संशयित आरोपी हा फिर्यादीच्या नातीसोबत अधूनमधून घरी येत होता. त्याला घरात मोठी रक्कम असल्याची माहिती होती. फिर्यादी कुटुंबीय घराबाहेर असल्याची संधी साधून त्याने बंद घरात प्रवेश केला आणि घरातील सर्व रक्कम चोरून नेली. संशयिताने आपल्या एका मित्राच्या सहाय्याने ही चोरी करीत मैत्रिणीचा विश्वासघात केला.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी संशयित आरोपीला पकडून ताब्यात घेतले. तेव्हा त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी संशयिताकडून चोरीतील ७.४६ लाख रुपये रक्कम जप्त केली. तर, संशयिताने चोरीतील रक्कम काही ठिकाणी गुंतवली असून सदर रक्कम जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांनी चालवली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करीत संशयित कबीर प्रधान याला अटक केली. तर त्याच्या कमलेश या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर व उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस करत आहेत.
चोरीतील ७.४६ लाख जप्त
तक्रार दाखल होताच पोलिसांनी कबीरला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ७.४६ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली. उर्वरित चोरीतील पैसे त्याने विविध ठिकाणी गुंतवल्याचे निष्पन्न झाले असून ती रक्कम जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.