एसी सव्हिसिंगच्या नावाखाली फसवणूक

मडगावात दोघांना दिले पोलिसांच्या ताब्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
1 hours ago
एसी सव्हिसिंगच्या नावाखाली फसवणूक

मडगाव : मडगाव येथे एसी सर्व्हिसिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोन उत्तरप्रदेशातील युवकांना स्थानिक रहिवासी सादिक यांनी रंगेहाथ पकडून मडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. ऑनलाइन जाहिरातीतून कमी किमतीत एसी सर्व्हिसिंगचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे.
सादिक यांनी त्यांच्या घरातील एसीच्या सर्व्हिसिंगसाठी गुगलवर शोध घेतला असता ‘गोवा एअर कंडीशनर’ या नावाने जाहिरात करणारा क्रमांक मिळवला. साधारणत: १२०० ते १५०० रुपयांना केली जाणारी सर्व्हिसिंग सेवा ऑनलाइन जाहिरातीत फक्त ६५० रुपयांना असल्याचे पाहून त्यांनी त्या मेकॅनिकला बोलावले.
घरी आलेल्या दोन युवकांनी एसी सर्व्हिसिंग सुरू करण्याच्या नावाखाली एसीमधील गॅस मुद्दाम सोडला आणि मग गॅस संपला आहे, पुन्हा भरावा लागेल, असे सांगत ३५०० रुपये मागू लागले. महिनाभरापूर्वीच एसीमध्ये गॅस भरलेला असल्याने सादिक यांना शंका आली. त्यांनी दोघांची झाडाझडती घेतली असता, त्यांनीच गॅस सोडल्याचे त्यांनी कबूल केले.
पुढील चौकशीत या युवकांनी सांगितले की, उत्तरप्रदेशातील नदीम नावाच्या व्यक्तीने त्यांना गोव्यात एसी सर्व्हिसिंगचे काम मिळवून दिले आहे. तसेच गॅस सोडून किंवा इतर पार्ट खराब झाल्याचे खोटे सांगून ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे उकळण्याचे काम ते आणि आणखी काहीजण करतात, हेही त्यांनी स्पष्ट केले. दोन महिन्यांपासून ते गोव्यात असून प्रामुख्याने पणजी परिसरात काम केल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर सादिक यांनी फैजू आणि सनाबाज या दोघा संशयितांना मडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. मडगाव पोलिसांनी या प्रकरणातील अधिक तपास सुरू केला आहे.

हेही वाचा