गोवा : गोव्याने उत्तर प्रदेशला १२५ धावांत गुंडाळले

कूच बिहार करंडक : कर्णधार यशचे नाबाद अर्धशतक, मिहीरचा भेदक मारा

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
गोवा : गोव्याने उत्तर प्रदेशला १२५ धावांत गुंडाळले

पणजी : सांगे क्रिकेट मैदानावर सोमवारपासून प्रारंभ झालेल्या १९ वर्षांखालील कूच बिहार करंडक (Cooch Behar Trophy) एलिट (Elite-चार दिवसीय सामना) स्पर्धेत गोवा संघाने (Goa team) पहिल्याच दिवशी आपली पकड मजबूत केली आहे. गोव्याने आपल्या पहिल्या डावात ३९ षटकांत ३ बाद १४२ अशी मजल मारली आहे. तर उत्तर प्रदेश (Uttar Pradesh)चा पहिला डाव गोव्याने ४२.४ षटकांत १२५ धावांत गुंडाळला.

गोवा संघाकडून मिहीर कुडाळकर याने भेदक मारा करताना अवघ्या १० धावांत ५ गडी बाद करत यूपी संघाचे कंबरडे मोडले. चिगुरुपती व्यंकट याने ३२ धावांत ३ गडी बाद करत त्याला सुरेख साथ दिली. कर्णधार यश कसवणकरने २५ धावांत १ व शिवेन बोरकरने १५ धावांत १ गडी बाद केला. यूपीकडून भावी शर्मा याने झुंज देताना ८४ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ६१ धावा केल्या. सलामीवीर अनमोल नुशरान याने ३४ धावांची भर घातली. विशेष म्हणजे २ बाद ८५ अशा सुस्थितीतून त्यांची सर्वप्रथम ४ बाद ८६ अशी घसरगुंडी उडाली व यानंतर ठराविक अंतराने गडी गमावल्याने त्यांची पकड ढिली होत गेली.
गोव्याने दिवसअखेर यूपीच्या धावसंख्येला मागे टाकताना १७ धावांची आघाडी देखील मिळविली आहे. सलामीवीर सार्थक भिके (१०) याला लवकर गमावल्यानंतर आदित्य कोटा (४८) व शांतनू नेवगी (२८) यांनी दुसर्‍या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. यानंतर आदित्य व कर्णधार यश कसवणकर यांनी तिसर्‍या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी करत गोवा संघाला यूपीवर आघाडी मिळवून दिली.
दिवसअखेर मिहीर कुडाळकर (०) आपल्या कर्णधाराला साथ देत नाबाद खेळपट्टीवर होता. यूपीकडून यश व आदित्य यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला आहे. मंगळवारी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी गोव्याचा संघ पहिल्या डावाच्या आधारे किमान शतकी आघाडी घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
कर्णधार यश कसवणकरची कप्तानी खेळी
कर्णधार यश कसवणकरने (नाबाद ५२) आदित्य कोटा सोबत तिसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला आघाडी मिळवून दिली. यश कसवणकरने केवळ ५६ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार व १ षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले.