ईडीने मुदतीत आरोपपत्र दाखल न केल्याने जामीन द्या!

शिवशंकर मयेकरचा अर्ज : हणजूण कोमुनिदाद जमीन हडपप्रकरणी अटकेत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th December, 11:42 pm
ईडीने मुदतीत आरोपपत्र दाखल न केल्याने जामीन द्या!

पणजी : हणजूण कोमुनिदाद जमीन हडप प्रकरणात मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवशंकर मयेकर याला अटक केली आहे. या संदर्भात मुदतीत आरोपपत्र दाखल केले नसल्याचा दावा करून मयेकर याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी मेरशी येथील विशेष न्यायालयात १५ रोजी होणार आहे.

म्हापसा पोलिसांनी एप्रिल २०२५ मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यात हणजूण कोमुनिदादची सुमारे लाखो चौ. मी. जमीन बनावट दस्तावेजाद्वारे हडप केल्याची तक्रार कोमुनिदादच्या अ‍ॅटर्नीने दिली होती. संबंधित जमीन १९५२ मध्ये बनावट विक्री पत्राद्वारे हडप केल्याचे तक्रारीत म्हटले होते. याच दरम्यान या प्रकरणात मनी लाँड्रिंग प्रकरणी संशय व्यक्त करून ईडीने प्राथमिक चौकशी सुरू केली. ईडीने ९ सप्टेंबर २०२५ रोजी हणजूण, आसगाव, हैदराबाद येथे मिळून १३ ठिकाणी छापे टाकले. ईडीने यशवंत सावंत यांच्यासह स्थानिक पंच आणि एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर आणि कार्यालयावर कारवाई केली. यात हणजूण कोमुनिदादची १,२०० कोटी रुपये किमतीची ३.५ लाख चौ.मी. जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला. ईडीने यशवंत सावंत व इतरांकडून ७२ लाखांची रोख रक्कम, सात आलिशान गाड्या आणि महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले. त्यानंतर ईडीने १ ऑक्टोबर रोजी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शिवशंकर मयेकर याला अटक केली होती.

दरम्यान, वरील आरोपपत्र ठरल्या मुदतीत दाखल केले नसल्याचा दावा करून शिवशंकर मयेकर याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ रोजी होणार आहे.

ईडीकडून ५ लाख चौ. मी. जमीन तात्पुरती जप्त

ईडीने १,२६८.६८ कोटी रुपये किमतीची ५ लाख चौरस मीटर जमीन तात्पुरती जप्त केली. त्यात बार्देश तालुक्यातील हणजूण, आसगाव व उसकई मधील १९ स्थावर मालमत्तांचा यात समावेश आहे. यापूर्वी ईडीने १२.८५ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू आणि बँक खाती गोठवली होती. ईडीने मेरशी येथील विशेष न्यायालयात शिवशंकर मयेकर याच्यासह इतरांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.