वासंती सालेलकर यांचा मृत्यू विजेचा शॉक लागूनच

वैद्यकीय अहवालात स्पष्ट : सायंकाळी झाले अंत्यसंस्कार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th December, 11:27 pm
वासंती सालेलकर यांचा मृत्यू विजेचा शॉक लागूनच

डिचोली : कोळशेकातर-कारापूर येथे विजेचा झटका लागून संशयास्पदरीत्या मृत्यू झालेल्या वासंती सालेलकर यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी डॉक्टरांच्या पॅनलमार्फत व्हावी, अशी मागणी तिचे नातेवाईक तसेच समाजसेवकांनी केली होती. या मागणीनुसार गुरुवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तिच्या मृतदेहाची शवचिकित्सा केली. प्राप्त अहवालानुसार वासंती यांचा मृत्यू विजेचा शॉक लागूनच झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

डिचोली पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजय राणे यांनी याबाबत माहिती दिली. शवचिकित्सा पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती उपअधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी यांनी दिली. सर्व शक्यता तपासत पोलिसांकडून विविध माध्यमातून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

न्यायप्रविष्ट असलेल्या एका मालमत्तेमध्ये वासंती सालेलकर राहत होत्या. सदर मालमत्तेबाबत न्यायालयीन वाद सुरू होता. या पार्श्वभूमीवर वासंती यांच्या मृत्यूला घातपाताचे स्वरूप असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी व काही समाजसेवी कार्यकर्त्यांनी केला होता. त्यांनी याप्रकरणी सखोल चौकशीसह वैद्यकीय अहवाल पॅनलमार्फत मिळावा, अशी मागणी केली होती.

घटना घडताच पोलिसांनी तातडीने पंचनामा केला. वीज विभागाच्या अभियंत्यांना घटनास्थळी बोलावून विजेचा धक्का नेमका कशामुळे बसला याची कारणमीमांसा करण्यास सांगितले. त्याचप्रमाणे श्वानपथक व विशेष फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी बोलावून आवश्यक तपास करण्यात आला. बुधवार, दि. ३ डिसेंबर रोजी उपअधीक्षक श्रीदेवी यांनी संपूर्ण घराची पाहणी करून संबंधित व्यक्तींशी चर्चा केली. त्यांनी कोणतीही हयगय न करता तपास सर्व बाजूंनी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

घरच्यांनी सादर केलेल्या निवेदनानुसार डॉक्टरांच्या पॅनलमार्फत शवचिकित्सा करण्यात आली असून अहवालात मृत्यू विजेचा शॉक लागूनच झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी वासंती यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीर्घ काळापासून मालमत्ता विषयक वाद

वासंती या मालमत्ता-विषयक संघर्षात दीर्घ काळापासून झगडत होत्या. या काळात दोन-तीन वेळा त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाल्याची माहिती समोर आली होती. अगदी त्यांच्या वापरातील विहिरीमध्ये विष टाकण्याचाही प्रयत्न झाला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी या प्रकरणासाठी नवीन वकील नेमला होता आणि खटल्याची पुढील सुनावणी १० डिसेंबर रोजी होणार होती. त्याआधीच विजेचा झटका लागून त्यांचा मृत्यू झाला.