घरातून पळालेल्या मुलाची टीसीमुळे कुटुंबीयांसोबत भेट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10 hours ago
घरातून पळालेल्या मुलाची टीसीमुळे कुटुंबीयांसोबत भेट

मडगाव : मंगळुरू एक्स्प्रेसमधील एस ३ या डब्यात एक १३ वर्षीय मुलगा तिकीट तपासणीस राघवेंद्र शेट्टी यांना आढळून आला. चौकशी केली असता शाळेच्या हॉस्टेलमधून मुलगा पळून आल्याचे समोर आले. रेल्वे पोलीस दलाच्या सहाय्याने मुलाला पुन्हा त्याच्या आईशी भेट घालून देण्यात आली.

कोकण रेल्वे मार्गावरील मंगळुरू एक्स्प्रेसमध्ये ४ डिसेंबर रोजी एस ३ या डब्यात एक अल्पवयीन मुलगा एकटाच प्रवास करत होता. तिकीट तपासणीस राघवेंद्र शेट्टी यांनी सदर मुलाकडे चौकशी केली असता त्याला प्रवासाबाबत योग्य माहिती देता आली नाही. त्यांनी त्याच्या बॅगेची तपासणी केली असता, शाळेचे ओळखपत्र आढळून आले. त्यानंतर राघवेंद्र यांनी शाळेच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता सदर मुलगा त्याच्या बोर्डिंग हॉस्टेलमधून पळून गेल्याचे सांगण्यात आले. सदर मुलगा त्याच्या आईसोबत राहत असून ती घरकाम करते. तिलाही मुलगा सापडल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली. उडपी आरपीएफकडे मुलाला सुपूर्द केल्यानंतर बालसंगोपन केंद्रात ठेवण्यात आले. तिकीट तपासणीस राघवेंद्र यांच्या या कृतीची दखल घेत कोकण रेल्वे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी त्यांना पाच हजाराचे बक्षीस जाहीर करत कामाचे कौतुक केले.