भारतीय लष्कराच्या निवृत्त सुभेदारासह महिला गुजरात एटीएसच्या ताब्यात

सुभेदार गोव्यात होता वास्तव्यास : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याचा आरोप

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
9 hours ago
भारतीय लष्कराच्या निवृत्त सुभेदारासह महिला गुजरात एटीएसच्या ताब्यात

पणजी : गोपनीय आणि संवेदनशील राष्ट्रीय सुरक्षाविषय माहिती पाकिस्तानला (Pakistan) पुरवल्याच्या आरोपावरून गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) (Gujarat ATS) दोघांना अटक केली असून त्यात गोव्यात राहणाऱ्या भारतीय लष्कराच्या निवृत्त सुभेदाराचा (retired Subhedar living in Goa) समावेश आहे.

अटक केलेल्यांत ४७ वर्षीय अजयकुमार सुरेन्द्रसिंग सिंग (Ajaykumar Surendra Sing) (मूळ बिहार, सध्या रा. नुवे) आणि ३५ वर्षीय रश्मनी रविंद्रपाल (Rashmani Ravindrapal) यांचा समावेश आहे. रश्मनी मूळची उत्तर प्रदेशातील असून सध्या दादरा आणि नगर हवेली येथे राहते. दोघांवर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एटीएस अधिकाऱ्यांनी​ दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील गुप्तचर अधिकारी सोशल मीडिया, मेसेजिंग अॅप्स आणि बनावट ऑनलाइन प्रोफाइलचा वापर करून भारतीय पुरुष, महिला आणि सुरक्षा दलांच्या सदस्यांकडून आर्थिक फायद्यांच्या मोबदल्यात गुप्त माहिती मिळवत होते. अजयकुमार यांच्याशी २०२२ मध्ये नागालँडमधील दीमापुर येथे त्यांची पोस्टिंग असताना ‘अंकिता शर्मा’ या बनावट नावाने एका हॅण्डलरने संपर्क साधला होता. या हॅण्डलरने विविध आर्मी युनिट्सची माहिती, अधिकाऱ्यांचे आणि जवानांचे बदली तपशील, तसेच त्यांच्या हालचालींबाबत माहिती मागितली. अजयकुमार यांनी युनिट्सच्या बदली आणि तैनातीसंबंधी तपशील पाठवले. त्यानंतर हॅण्डलरने त्यांना मोबाइलवर एक ट्रोजन मालवेअर फाइल पाठवून ती इन्स्टॉल करण्याच्या सूचना दिल्या, ज्यामुळे त्यांच्या फोनला थेट प्रवेश मिळू शकला.

रश्मनी रविंद्रपाल ही अब्दुल सत्तार आणि खालिद या हॅण्डलर्ससाठी मध्यस्थी करत असल्याचे उघड झाले आहे. तिने ‘प्रिया ठाकूर’ या बनावट ओळखीने लष्करी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून गोपनीय माहिती गोळा केली. तसेच हॅण्डलर्सच्या सूचनेनुसार पैसे मिळवण्यासाठी आणि हस्तांतरित करण्यासाठी तिने एक बँक खातेही उघडले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

तीन हॅण्डलर्स पाकिस्तानमध्ये...

दोन्ही आरोपींकडून जप्त केलेल्या पुराव्यांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून आलेल्या व्हॉट्सअॅप कॉल्सची नोंद, कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांचा समावेश आहे. तपासात हॅण्डलर्सचे आयपी अॅड्रेस पडताळल्यावर ‘अंकिता शर्मा उर्फ राधिका’ ही पाकिस्तानातील मुलतान आणि सरगोधा येथे असल्याचे, अब्दुल सत्तार हा लाहोरमधील असल्याचे, तर खालिद हा व्हीपीएन आणि मलेशियन वर्च्युअल नंबरद्वारे कार्यरत असल्याचे समोर आले.


हेही वाचा