
नवी दिल्ली : जनगणना (Census) २०२७ ची प्रक्रिया दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालायाने (Union Home Ministry) लोकसभेत (Loksabha) दिली. याची सुरवात २०२६ मध्ये यादी तयार करणे व घरांचा डेटा एकत्र करण्यापासून सुरू होणार आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात तपशील देताना, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात गृहगणना व दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची गणना होणार आहे.
पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर, २०२६ यामध्ये ३० दिवसांनी पूर्ण होणार. यासाठी राज्ये व केंद्रशासित प्रदेश वेळापत्रक ठरवणार. दुसरा टप्पा फेब्रुवारी, २०२७ मध्ये होणार व त्यात लोकसंख्येची गणना होणार. जनगणना २०२७ चे वेळापत्रक मागील जनगणनेत वापरल्याप्रमाणेच ठेवण्यात आले आहे.
लडाख व जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडच्या बर्फाळ प्रदेशासाठी लोकसंख्येची गणना सप्टेंबर, २०२६ मध्ये होणार आहे. १ ऑक्टोबर, २०२६ ही संदर्भ तारीख मानणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.