सिस्टीममध्ये बिघाड; देशातील अनेक विमानतळांवर सेवा विस्कळीत

विमानसेवेवर परिणाम : हैदराबाद विमानतळावर गोंधळ

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
03rd December, 05:08 pm
सिस्टीममध्ये बिघाड; देशातील अनेक विमानतळांवर सेवा विस्कळीत

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे कायम विमानसेवेवर परिणाम झालेला दिसत आहे. त्यातच आता देशातील अनेक विमानतळांवर (Airport)  बुधवारी सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने, चेक इन प्रणाली विस्कळीत झाली. त्याचा फटका विमानसेवेला बसला. काही विमानांना विलंब झाला तर हैदराबाद (Hydrabad) विमानतळावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. 

‘जगभरात मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या प्रमुख सेवा खंडित झाल्या आहेत.  त्यामुळे विमानतळावरील आयटी सेवा, चेक इन यंत्रणेवर परिणाम झाला असल्याचे वाराणसी विमानतळावर एका सूचना फलकाद्वारे प्रवाशांना कळविण्यात आले. 

या सूचनेनुसार,स्पाईसजेट (Spice Jet), अकासा एअर (Akasa Air), इंडिगो (Indigo), एअर इंडिया (Air India) या कंपन्यांना विमानतळावर फटका बसला. विमान कंपन्या किंवा मायक्रोसॉफ्टकडून यावर तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. विमान कंपन्यांनी कामकाज सुरळीत करण्यासाठी मॅन्युअल चेक इन व बोर्ड‌िंग प्रक्र‌िया सुरू केल्याची माहिती आहे. 

हैदराबाद विमानतळावर गोंधळ

विमानसेवेत निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोंधळ निर्माण झाला. बुधवारी सकाळी या विमानतळावर मोठ्या संख्येने प्रवासी विमान कंपनीच्या मदत कक्षासमोर जमा झालेले एका व्हिडीओत दिसत होते. विमानसेवेबाबत विचारणा करताना दिसत होते. विमाने वेळेवर पोचत नसल्याने; संतप्त बनलेले प्रवासी तिकिट व मोबाईल घेऊन त्याठिकाणचे व्हिडीओ काढत होते. निश्च‌ित माहिती देण्याची मागणी करीत होते. 

बंगळुरू विमानतळावर सेवा विस्कळीत

बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरही विमानसेवा विस्कळीत झाल्याने, चार विमानांना विलंब झाला. इंडिगोच्या सेवेला फटका बसला व सेवा रद्द करावी लागली. कंपनीने ४२ उड्डाणे रद्द केली. त्यात २० निर्गमन तर २२ आगमन विमानांचा समावेश होता. 

दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडचण निर्माण झाल्यानंतर ट्व‌िटरवर सूचना जारी करून माहिती देण्यात आली की, देशांतर्गत विमान कंपन्यांना सेवा प्रणालीत अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे विमानांना विलंब किंवा वेळापत्रकात बदल होऊ शकतो. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांत आलेल्या आपत्ती व तांत्र‌िक कारणांमुळे विमानसेवेला त्याचा मोठा फटका बसला आहे. अनेक विमान उड्डाणे रद्द करावी लागली तर विमानसेवा विस्कळीत झाली. 

हेही वाचा