ह्रदय हेलावणारी घटना; चार वर्षांचा चिमुकला ट्रॅक्टरसहीत पडला विहिरीत

दुर्दैवी अंत

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
28th November, 04:47 pm
ह्रदय हेलावणारी घटना; चार वर्षांचा चिमुकला ट्रॅक्टरसहीत पडला विहिरीत

सोलापुर : सोलापुर (Solapur)  येथे एक ह्रदय हेलावून सोडणारी घटना घडली. चार वर्षांचा चिमुकला खेळता खेळता ट्रॅक्टरवर (Tractor)  चढला. आणि चुकून हात लागून गियर पडल्याने ट्रॅक्टरसहीत जवळच असलेल्या विहिरीत पडला.

सर्वांनाच धक्का देणारी ही घटना सोलापुर  जिल्ह्यातील बार्शी (Barshi) येथे घडली. या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला. शिवराज शेरखाने (Shivraj Sherkhane)  असे या लहानग्याचे नाव आहे. १२ तासांच्या प्रयत्नांनंतर शेवटी त्याचा मृतदेह बाहेर काढला. 

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी बार्शीतील शेळगाव येथे विहिरीतून मोटर बाहेर काढण्यात येत होता. विहिरीजवळ ट्रॅक्टर उभा करून ठेवलेला होता. सर्वजण आपल्या कामात मग्न असताना जवळच खेळत असलेला लहान मुलगा शिवराज अचानक त्या ट्रॅक्टरवर चढला. हात लागून गियर पडल्याने ट्रॅक्टर पुढे सरकला व थेट विहिरीत जाऊन कोसळला. 

जवळच त्याचे वडील काम करीत होते. त्यांनी हे पाहिले व एकच टाहो फोडत पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. आरडाओरड करीत विहिरीत जाऊन पाहिले. आवाज ऐकून गावातील काही युवक आले व विहिरीत उड्या मारून शिवराजचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

स्थानिक पोलीस व अग्न‌िशमन दलालाही बोलावण्यात आले. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन राबवले. खोल पाणी, चिखल व अडकलेला ट्रॅक्टर यामुळे शोध घेणे कठीण झाले. त्यानंतर गावातील लोकांनी विहिरीतील पाणी बाहेर काढण्याची शक्कल लढवली. अखेर १२ तास कसून प्रयत्न केल्यानंतर पाणी कमी झाले व विहिरीच्या तळाशी असलेला चिमुकल्याचा मृतदेह सापडला. त्यानंतर सर्वांनीच हळहळ व्यक्त केली.  


हेही वाचा