चंद्रपूर मुल राष्ट्रीय महामार्गावर वन्यप्राण्यांचा मुक्त संचार

चंद्रपूर : शिकार शोधण्यासाठी घनदाट रानात फिरणाऱ्या वाघाने चक्क राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्याची घटना घडली आहे. त्यामुळे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली. महाराष्ट्रात (Maharashtra) चंद्रपूर (Chandrapur) येथे राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) वाघ (Tiger) ठाण मांडून बसला. वाहने जवळ येऊन ठेपली तरी उटण्याचे नावच घेत नव्हता. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला व रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांग लागली.
चंद्रपूर मुल या महामार्गावर आगडी फायरलाईन येथे वाघाचा हा प्रसंग घडला. ‘मामा मेल’ असे या वाघाचे नाव असून, या परिसरात कायम फिरत असतो. स्थानिकांच्या दोन बैलांची या वाघाने शिकार केली. त्यामुळे शेतकरीही चिंतीत आहेत. या परिसरात संचार करणारा वाघ एकदम धाडसी संबोधला जात आहे. वाहने, माणसे व कुणाचीच पर्वा न करता मुक्तपणे संचार करतो.
दरम्यान, वाघाने महामार्ग रोखून धरल्याने अर्धा तास वाहतूक अडकून पडली. वाघाच्या हालचालींवर वन विभागही लक्ष ठेवून होता. चंद्रपूर मुल राष्ट्रीय महामार्ग ९३० वन्यप्राण्यांच्या फिरण्यामुळे चर्चेत येत आहे. अनेक वन्यप्राणी या रस्त्यावर मुक्तपणे संचार करतात व त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.