राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

नवी दिल्ली : न्यायमूर्ती सूर्य कांत (Justice Surya Kant) यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court of India ) ५३ वे सरन्यायाधीश (chief justice ) म्हणून शपथ घेतली. सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद व गोपनियतेची शपथ दिली. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या निवृत्तीनंतर आता न्यायमूर्ती सूर्य कांत देशाचे ५३ वे सरन्यायाधीश बनले आहेत.
राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. त्याचबरोबर मलेशिया, भूतान, नेपाळ, केनिया, मॉरिशस, ब्राझिल, श्रीलंका या सात देशांचे मुख्य न्यायाधीश कुटुंबियांसह उपस्थित होते.
सरन्यायाधीश म्हणून मिळणार १५ महिने
न्यायमूर्ती सूर्य कांत यांना सरन्यायाधीश म्हणून १५ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. ९ फेब्रुवारी, २०२७ मध्ये निवृत्त होणार आहेत.
नव्या सरन्यायाधीशांची माहिती
हरयाणातील हिसार येथे १० फेब्रुवारी, १९६२ साली न्या. सूर्य कांत यांचा जन्म झाला. एका सर्वसामान्य मध्यवर्गीय कुटुंबात जन्म होऊनही त्यांनी मेहनत, बुद्धी व चिकाटीने सरन्यायाधीश पदापर्यंत मजल मारली. १९८४ मध्ये एका छोट्या शहरात वकिली सुरू करून नंतर देशाचे सरन्यायाधीश होईपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे. राष्ट्रीय व घटनात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या निकालांमध्ये त्यांचा सहभाग होता.