समोरासमोर बसवून एनआयएकडून डॉक्टरांची चौकशी सुरू

नवी दिल्ली: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासामध्ये गुप्तचर यंत्रणांनी एका मोठ्या आंतरराज्यीय दहशतवादी नेटवर्कचा आणि 'व्हाईट कॉलर' दहशतवादी मॉड्यूलचा सनसनाटी खुलासा केला आहे. हमासच्या मोडस ओपरेंडी नुसार दहशतवाद्यांनी काश्मीरमधील रुग्णालयांना शस्त्रास्त्रांचे ठिकाण बनवण्याचा कट रचल्याचे उघड झाले आहे. दहशतवाद्यांचा नागरी वस्त्या आणि रुग्णालयांचा वापर करण्याचा हेतु होता ही बाब देखील तपासात उघड झाली आहे.

दहशतवादी डॉक्टरांचे नेटवर्क आणि हँडलर्सची साखळी
समोर आलेल्या माहितीनुसार, या मॉड्यूलशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्ती वेगळ्या हँडलरला रिपोर्ट करत होता. बॉम्बस्फोट घडवणारा आरोपी उमर आणि त्याचा साथीदार डॉ. मुजम्मिल यांचे हँडलर वेगळे होते. दोन प्रमुख हँडलर मन्सूर आणि हाशिम हे इब्राहिम नावाच्या एका वरिष्ठ हँडलरच्या अखत्यारीत काम करत होते, जो संपूर्ण मॉड्यूलच्या कार्यावर देखरेख करत होता. या मॉड्यूलने मोठमोठ्या शस्त्रास्त्रांसाठी निधी गोळा केला होता. डॉ. मुजम्मिलने तब्बल ६.५ लाख रुपयांना एके-४७ रायफल विकत घेतली होती, जी नंतर आरोपी अदीलच्या लॉकरमधून जप्त झाली.
पैशांवरून वाद
अल-फलाह विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये फंडिंगच्या पैशांवरून डॉ. मुजम्मिल आणि उमर यांच्यात जोरदार भांडण झाले होते, जे अनेक विद्यार्थ्यांनी पाहिले होते. या भांडणानंतर उमरने आपली लाल इकोस्पोर्ट कार, ज्यात आधीच स्फोटक सामग्री होती, ती मुजम्मिलला दिली.
अल-फलाह विद्यापीठाची लॅब आणि केमिकल्सची चोरी
डॉ. मुजम्मिलने बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे रसायन अल-फलाह विद्यापीठाच्या केमिस्ट्री लॅबमधून चोरल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. लॅबमधील काचेची भांडी, वापरलेले साहित्य आणि रसायनांच्या नोंदी जुळत नाहीत. छोट्या बॅचमध्ये हे साहित्य लॅबमधून बाहेर नेले गेले आणि शैक्षणिक कार्याचे नाव देऊन ही चोरी लपवण्यात आली. स्फोटकांचे अचूक मिश्रण तयार करण्यासाठी ही उपकरणे आवश्यक होती. एनआयएने याच संदर्भात डॉ. मुजम्मिल, डॉ. शाहीन आणि डॉ. अदील यांना समोरासमोर बसवून चौकशी सुरू केली आहे.
जैशचा हमास स्टाईल कट
सुरक्षा यंत्रणांना मोठा खुलासा झाला आहे की, जैश-ए-मोहम्मदचा हा दहशतवादी मॉड्यूल काश्मीरमधील सरकारी रुग्णालयांना शस्त्रास्त्रांचे आणि दहशतवादी कारवायांचे ठिकाण बनवण्याचा प्रयत्न करत होता. १९९० नंतर प्रथमच दहशतवादी रुग्णालयांना लक्ष्य करत असल्याने, सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या कटाचा भाग म्हणून गांदरबल आणि कुपवाडा जिल्ह्यांमधील अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या लॉकर्सची कसून तपासणी सुरू आहे.

बॉम्ब बनवण्याचे ४० व्हिडिओ:
पाकिस्तानमधून जैशचा हँडलर हंजुल्ला याने डॉ. मुजम्मिलला बॉम्ब बनवण्याचे ४० व्हिडिओ पाठवले होते. एनआयएने फरीदाबादच्या धौज गावात एका टॅक्सी चालकाच्या घरातून आटा चक्की आणि काही इलेक्ट्रॉनिक मशीन्स जप्त केल्या आहेत. डॉ. मुजम्मिल याच चक्कीत युरिया दळून, ते रिफाईन करून स्फोटक तयार करत होता. त्याने हे स्फोटक अमोनियम नायट्रेटसह एकत्र करून साठवले होते. उमर ऑनलाइन 'ओपन-सोर्स कंटेंट'च्या माध्यमातून बॉम्ब बनवण्याचे व्हिडीओ आणि मॅन्युअल अभ्यासत होता. त्याने नूह येथून रासायनिक घटक आणि दिल्लीतील बाजारातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी केली होती.

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर एनआयए आणि स्थानिक पोलीस या संपूर्ण 'व्हाईट कॉलर' नेटवर्कला मुळापासून उखडून टाकण्याच्या कामात गुंतले आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनीही या पार्श्वभूमीवर अमोनियम नायट्रेट खरेदी-विक्रीवर कठोर डिजिटल देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.