
मडगाव : पक्ष बदलू नेत्यांबाबत भूमिकेसह काही मुद्द्यांवर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चेनंतर यावर स्पष्टता आल्यानंतर युतीबाबतचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर (Congress Party Goa President Amit Patkar) यांनी दिली.
मडगाव येथील दक्षिण गोवा (South Goa) जिल्हा काँग्रेस (District Congress) कार्यालयात काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गिरीश चोडणकर (Girish Chodankar), खासदार विरियातो फर्नांडिस, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव (Yuri Alemao), एल्टन डिकोस्टा, एम. के. शेख आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा पंचायत निवडणुकांबाबत रणनीतीवर चर्चा झाली.
बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी सांगितले की, जिल्हा पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची तयारी सुरू आहे. उमेदवारांची अर्ज प्रक्रिया गट व जिल्हास्तरावर झाल्यानंतर समितीकडे आलेले आहेत व त्यावर चर्चाही झालेली आहे.
या निवडणुकीत विरोधकांच्या एकजुटीची मागणी होत आहे. त्या दृष्टिकोनातून समान विचारसरणीच्या पक्षांसोबत जिल्हा पंचायत निवडणुकीत युती करण्याबाबतचा निर्णय प्रत्यक्ष चर्चेअंती घेण्यात येईल.
मागील दोन-तीन दिवसांत ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्यावर स्पष्टता येण्याची गरज आहे त्यासाठी समविचारी पक्षाच्या नेत्यांशी बैठक होईल व त्यानंतरच युती बाबतचा निर्णय घेण्यात येईल असे पाटकर यांनी सांगितले.
आमदार युरी आलेमाव म्हणाले की, काँग्रेसने कोणत्याही पक्षांतर करणाऱ्यांना पक्षात परत न घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः जेव्हा आम्ही न्यायालयात त्यांच्याविरुद्ध लढत आहोत.
पक्षांतर ही अशी गोष्ट आहे, ज्याच्या विरोधात आमचा पक्ष लढत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पक्षांतर थांबवले पाहिजे असेच सांगितले आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती युती धर्माबद्दल बोलते तेव्हा तुम्ही उमेदवार जाहीर करू शकत नाही आणि त्यांच्यासोबत पुढे जाऊन प्रचार सुरू करू शकत नाही.
काँग्रेसकडे उमेदवार तयार आहेत पण युतीबाबत वाट पाहत आहोत. पक्षांतर विरोधी तत्त्वांसारखी काही तत्त्वे आहेत ज्यांशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही, असे युरी आलेमाव म्हणाले.