
पणजी: मागील काही वर्षांमध्ये गोव्यातील जमिनींना चांगले दर आले आहेत. यामुळे काही भाटकार मुंडकारांच्या घरांसहित आपल्या जमिनी विकत आहेत. मात्र यापुढे मुंडकार कायद्यानुसार मुंडकाराच्या नावावर जमीन करून दिल्याशिवाय भाटकाराला उर्वरित जागा विकता येणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. शनिवारी त्यांनी 'व्हर्च्युअल' पद्धतीने राज्यभरातील पंचायतींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'माझे घर' योजनेची सविस्तर माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मागील तीन ते चार वर्षांत मुंडकाराला हक्काची जमीन न देताच जागा विकल्या जात आहेत. मुंडकाराला आपला भाटकार बदलला आहे, याची कल्पनाही नसते. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयासह महसूल तसेच पोलीस खात्यात लेखी तक्रारी आल्या आहेत. जुना भाटकार जाऊन नवीन भाटकार त्रास देत असल्याच्या तक्रारी येत असल्याने, सरकारने कायद्यात काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
नवीन नियमानुसार तरतुदी:
या नियमांनुसार, मुंडकाराने मुंडकार कायद्यानुसार अर्ज केला नसेल, पण तो पात्र असेल, तर भाटकाराला मुंडकाराला त्याची जागा द्यावीच लागेल. भाटकाराला मुंडकाराला जागा दिल्याची माहिती लेखी स्वरूपात मामलेदार कार्यालयात कळवावी लागणार आहे. त्यानंतरच त्याला उर्वरित जागा विकण्याची परवानगी मिळेल.
याशिवाय येणाऱ्या काळात 'माझे घर' योजनेअंतर्गत गृहनिर्माण मंडळातर्फे बांधलेल्या घरांना कायदेशीर अधिकार देणे, गृह सोसायटीसाठी जमीन नावावर करणे आणि पंचायत क्षेत्रात घर बांधणी परवाना देणे, आदी गोष्टी सुटसुटीत होणार आहेत. 'माझे घर' अंतर्गत घर दुरुस्ती परवाना तसेच घर क्रमांक विभागणी देण्याची प्रक्रिया जलद करण्यात आली आहे. घर क्रमांक विभागणी झाल्यावर शौचालय बांधण्यासाठीची योजना पुन्हा सुरू करण्यात येईल.
'माझे घर' योजना सुरू करून सरकारने मूळ गोमंतकीयांवरील टांगती तलवार दूर केली आहे. या योजनेनुसार सरकारी, कोमुनिदाद, खासगी व २० कलमी कार्यक्रम अंतर्गत दिलेली जागा नियमित करण्यात येईल. यानंतर जागा मालकांना 'रुका' (RUKA) अंतर्गत बांधकाम नियमित करण्यासाठी परवाने घ्यावे लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सवलत एकदाच मिळणार
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'माझे घर' योजनेनुसार अर्ज करण्यासाठी ४ एप्रिलपर्यंत मुदत आहे. ही सवलत एकदाच मिळणार असल्याने, लोकांनी मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे. या योजनेच्या विरोधात काही जण पैसे घेऊन न्यायालयात जात आहेत. मात्र, आम्हाला न्यायालयात देखील यश मिळेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.