युतीबाबत केवळ चर्चा, अजूनही प्रत्यक्ष बोलणी नाही : सरदेसाई

इजिदोर यांचा पक्ष प्रवेश भाजपला हरवण्यासाठीच : सरदेसाई

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
युतीबाबत केवळ चर्चा, अजूनही प्रत्यक्ष बोलणी नाही : सरदेसाई

मडगाव : निवडणुका (Election) जिंकण्याला प्राधान्य असून लोकांच्या मागणीनुसार विरोधकांच्या एकजुटीसाठी पुढाकार घेतला. महायुतीबाबत चर्चा पण प्रत्यक्षात बोलणी झालेली नाहीत. कमी वेळ राहिला असल्याने गोवा फॉरवर्डने (Goa Forward Party) उमेदवार जाहीर करत प्रचाराला सुरूवात केली.

इजिदोर फर्नांडिस (Isidore Fernandes) यांचा पक्षप्रवेश हा भाजपला हरवण्याच्या दृष्टीकोनातूनच केल्याचे गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई (MLA Vijay Sardesai) यांनी सांगितले.

आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले की, राज्यात जिल्हा पंचायतीसाठी 50 जागा असून भाजप वगळता कुणीही सर्व जागा लढवू शकत नाही. त्यामुळे भाजपला हरवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावे ही लोकांची भावना आहे.

विरोधी पक्ष नेत्यांनी मुलाखतीत ‘ग्रँड अपोझिशन अलाइन्स’ची घोषणा केलेली आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही बोलणी झालेली नसल्याचे ते म्हणाले.

 पैंगीण जिल्हा पंचायत निवडणुकीत प्रशांत नाईक यांना उमेदवारी दिलेली आहे. पैंगीणचा विचार करता काही मते ही ठराविक नेत्यांकडे आहेत.

त्या मतांशिवाय भाजपच्या उमेदवाराला हरवणे शक्य होणार नसल्याचे दिसून आल्याने इजिदोर फर्नांडिस यांना पक्षात प्रवेश दिला.

नाईक यांच्या विजय निश्चितीसाठी इजिदोर यांना पक्षात घेतले. जास्त अधिकार नसले तरी जिल्हा विकास आराखडा, विभागीय आराखडा व विकासकामे ही जिल्हा पंचायतीकडून केली जातात. 

न झाल्यास राजकारण सोडू 

पक्षबदलूंमुळे प्रादेशिक पक्षांना मोठा धोका आहे, हे मान्य आहे. पण सध्याचा हेतू हा भाजपचा पराभव करणे हा आहे. त्यासाठी केवळ बोलून नाही तर व्यावहारिकतेची गरज आहे. आरजीच्या मतांचा आम्ही आदर करतो.

युतीची चर्चा ज्यावेळी असेल त्यावेळी या सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल. सार्वजनिक ठिकाणी ‘तूतू मैमै करून काहीही होणार नाही, थेट चर्चा होण्याची गरज आहे. राज्यात एकास एक अशी लढत झाल्यास विरोधी पक्षांना 25 पेक्षा जास्त जागा मिळतील, न झाल्यास आपण राजकारण सोडू, असेही सरदेसाई म्हणाले.

भाषणे करून निवडणुका जिंकता येत नाहीत    

 निवडणुकांसाठी 28 दिवस राहिलेले असून, चर्चेसाठी किती दिवस काढायचे व उमेदवारांनी लोकांपर्यंत कधी पोहोचायचे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची निश्चिती व प्रचार सुरू करण्याची गरज आहे. केवळ भाषणे करून निवडणुका जिंकता येत नाहीत. मतदारांच्या घरापर्यंत जात मतांची मागणी केलेली आहे. 

कॉंग्रेसला ३०, गोवा फॉरवर्ड १०, आरजी १० जागा हव्यात 

 युतीची आपली संकल्पना ही गोवा फॉरवर्डला दहा, आरजीला दहा व काँग्रेसला 30 जागा अशी आहे. काँग्रेस भक्कम आहे, अशी सध्याच्या स्थिती नाही. त्यांना सर्व जागा लढायच्या असतील तर हा त्यांचा निर्णय असेल, आमचे मत कोणावरही थोपवू शकत नाही.

पण गोवा फॉरवर्ड दहा जागा लढून चांगला निर्णय देऊ शकतो तर दहा जागांवरच लढणार, असे आमदार सरदेसाई यांनी सांगितले.

भाजप विरोधी युती तुटण्याच्या प्रतीक्षेत  

प्रमोद सावंत व सुभाष फळदेसाई वगळता भाजपमध्ये 70 टक्के पक्ष पक्षबदलून आलेले आमदार आहेत. गोवा फॉरवर्डने इजिदोर यांना घेतले कारण त्यांच्याकडे साडेसहा हजारांपेक्षा जास्त मते असून, भाजपविरोधात निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना पक्षात प्रवेश दिला. भाजपविरोधात निवडणुका जिंकण्यासाठी रणनीती आवश्यक आहे.

युती तुटण्याची वाट पाहत असल्याने भाजपने उमेदवार जाहीर केलेले नाहीत, असे आमदार सरदेसाई यांनी सांगितले.

मते मागणे हा राजकारणाचा धर्म

लोकसभा निवडणुकांवेळी विरोधकांच्या एकजुटीमुळे कॅ. विरियातो फर्नांडिस यांचा विजय झाला. आरजीपी याबाबत आता बोलत आहे, पण त्यावेळी त्यांनी साथ दिली नव्हती.

त्यामुळे भूतकाळात जाण्याची गरज नाही. कुणीही राजा व्हायला पाहत नाही. राजकारणात सर्व मतांसाठी प्रयत्न करावयाचा आहे.

आरएसएसच्या व्यक्तींकडेही मतदार म्हणून जाऊन विकासकामे सांगत मते मागितली आहेत, हा राजकारणाचा धर्म आहे, असे आमदार सरदेसाई यांनी सांगितले.

हेही वाचा