डीजे क्रिस्पी क्रिस्टिनाचा गोव्यातील पोलिसांवर गैरवर्तनाचा गंभीर आरोप

व्हिडीओ व्हायरल.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
56 mins ago
डीजे क्रिस्पी क्रिस्टिनाचा गोव्यातील पोलिसांवर गैरवर्तनाचा गंभीर आरोप

पणजी: प्रसिद्ध सेलिब्रिटी डीजे क्रिस्पी क्रिस्टिना (DJ Krispie Kristina) हिने सोशल मीडियावर एका पुरुष पोलीस अधिकाऱ्याच्या गैरवर्तनाबद्दल केलेल्या पोस्टमुळे गोव्यातील पोलीस कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शिवोली-मोरजी मार्गावर मध्यरात्री वाहनांची तपासणी करताना पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला आणि आपल्या मैत्रिणींना शिवीगाळ केल्याचा आरोप तिने केला आहे.

क्रिस्टिनाने सोशल मीडिया पोस्टमध्ये नेमके काय घडले, याची माहिती दिली आहे. त्यानुसार, मध्यरात्री गाडीतून जात असताना पोलिसांच्या पथकाने त्यांना अडवले. क्रिस्टिनाच्या म्हणण्यानुसार, त्या पुरुष अधिकाऱ्याने सुरुवातीपासूनच अत्यंत उद्धटपणे बोलण्यास सुरुवात केली.



नेमके काय म्हटले क्रिस्टिनाने?

क्रिस्टिनाने आपल्या पोस्टमध्ये पोलिसांच्या गैरवर्तनावर आवाज उठवताना लिहिले:

बुधवारी मध्यरात्री मी माझ्या मैत्रिणींसोबत गाडी चालवत असताना एका पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला थांबवले. (तसे पाहिल्यास, महिलांना फक्त महिला पोलीस अधिकारीच थांबवू शकतात.) आणि त्याने सुरुवातीपासूनच खूप उद्धटपणे बोलण्यास सुरुवात केली. तो अधिकाराच्या गुर्मीत वागत होता आणि मी अनेक मित्रांकडून ऐकले आहे की, हे इथे सामान्य आहे. सुरुवातीलाच त्याने अत्यंत आक्रमकपणे, उद्धटपणे बोलायला सुरुवात केली आणि म्हणाला, "तुम्ही तुमच्या देशात परत जा. त्याला आमचे वाहन परवाना दाखवल्यानंतर त्याने आम्हाला जाऊ दिले. माझी मैत्रीण गाडी घेऊन जाऊ लागताच, त्याने तिला शिवीगाळ केली 'फ@# ऑफ!' असे म्हटले.


'लाजिरवाणी गोष्ट'

क्रिस्टिनाने पुढे म्हटले की, गोवा हे पर्यटनाच्या आधारे चालणारे राज्य आहे. अशा राज्यात पोलीस स्वतः इतके बेजबाबदार कसे वागू शकतात. हे लाजिरवाणे आहे. तो अधिकारी इतका आक्रमक होता की, तिला फोन काढण्याचीही भीती वाटली, त्यामुळे ती चित्रीकरण करू शकली नाही असेही ती म्हणाली.

हा सर्व प्रकार गोव्यातील पोलिसांच्या वर्तनावर आणि विशेषतः परदेशी पर्यटकांशी होणाऱ्या वागणुकीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. या पोस्टनंतर अनेकांनी अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी करावी आणि पोलीस तपासणीदरम्यान लोकांशी उद्धटपणे न वागता नीट वागणूक द्यावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा