जीवनशैलीजन्य रोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब ठरत आहेत मुख्य कारण; आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण

मुंबई: क्रॉनिक किडनी डिजीज (CKD) म्हणजेच मूत्रपिंडाचा रोग केवळ जगातच नव्हे, तर भारतीय लोकसंख्येतही अतिशय धोकादायक पद्धतीने पसरत असून, एक मोठे आरोग्य संकट म्हणून उदयास येत आहे. एका ताज्या वैद्यकीय अहवालाच्या माध्यमातून हा रोग लवकरच महामारीचा स्तर गाठू शकतो, असा गंभीर इशारा देण्यात आला आहे. पूर्वी ही समस्या केवळ वृद्ध किंवा व्यस्त जीवनशैली असणाऱ्या वर्गापुरती मर्यादित होती. मात्र, आता मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या अन्य जीवनशैलीजन्य आजारांमुळे हा रोग झपाट्याने वाढत आहे.

उपचार, खर्च आणि आरोग्य विम्याची स्थिती
अहवालातील माहितीनुसार, देशात दरवर्षी सुमारे दोन लाख लोक मूत्रपिंड निकामी होण्याच्या गंभीर अवस्थेत पोहोचतात, तर यापेक्षा दहापट अधिक लोक किडनीच्या आजारांनी ग्रस्त आहेत. मात्र, चिंताजनक बाब ही आहे की, यापैकी केवळ २५ टक्के रुग्णांनाच वेळेवर आणि योग्य उपचार मिळू शकतो. किडनीच्या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेल्या रुग्णांसाठी डायलिसिस आणि प्रत्यारोपण (Transplant) हे एकमेव पर्याय उरतात. १९९० च्या दशकात जिथे फक्त ५ टक्के लोकांकडे आरोग्य विमा होता, तिथे आज ६० टक्के लोकांकडे विमा आहे; तरीही दीर्घकाळ डायलिसिसचा खर्च अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आजही एक मोठे संकट आहे, ज्यामुळे अनेक कुटुंबांना उपचार थांबवावे लागतात.

आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी
रुग्णांची वाढती संख्या पाहता नेफ्रोलॉजिस्टची संख्या आणि वैद्यकीय सुविधा अजूनही खूप कमी आहेत. अहवालात नमूद केल्यानुसार, पैशांच्या कमतरतेमुळे कोणत्याही नागरिकाला उपचारापासून वंचित ठेवले जाऊ नये. प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सेवेचा अधिकार मिळावा यासाठी भारताला अमेरिकेतील 'मेडिकेअर' किंवा ब्रिटनमधील 'नॅशनल हेल्थ सर्व्हिस' सारख्या सर्वसमावेशक आरोग्य व्यवस्थेची तातडीने गरज आहे.
![]()
भारतीयांमध्ये मूत्रपिंड रोगाची कारणे
माहितीनुसार, भारतीयांमध्ये मूत्रपिंड रोगाची वाढ होण्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत:

दक्षिण भारतातील शेतकरी समुदायांमध्ये 'क्रॉनिक किडनी डिजीज ऑफ अननोन ओरिजिन' (CKDU) नावाचा एक रहस्यमय मूत्रपिंड रोग वेगाने पसरत आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील अनेक भागांमध्ये तरुण शेतकरी किडनी निकामी होण्याचे शिकार होत आहेत. हा रोग संसर्गजन्य नसून, तो काम करण्याची परिस्थिती आणि पर्यावरणाशी जोडलेला असू शकतो. याचे नेमके कारण अजूनही अज्ञात आहे, काही तज्ज्ञांच्या मते, तो उष्णता, निर्जलीकरण, तर काही जण खते व कीटकनाशकांनी दूषित झालेल्या मातीच्या संपर्कास कारणीभूत मानतात.

प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज
मूत्रपिंडाच्या आजारांच्या वाढत्या धोक्यापासून देशाला वाचवायचे असेल, तर उपचारांपेक्षा प्रतिबंधावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. पिण्याचे शुद्ध पाणी, सार्वजनिक स्वच्छता, लसीकरण आणि सशक्त सार्वजनिक आरोग्य व्यवस्था निर्माण केल्यास या रोगांना सुरुवातीलाच रोखणे शक्य आहे.

भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सारखी तंत्रज्ञान मूत्रपिंडाच्या रोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान करून योग्य उपचार मिळवून देण्यात क्रांती घडवतील, असा विश्वास अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.