इफ्फीत 'मास्टरक्लास' विभागाचे उद्घाटन; शाद अली यांनी घेतली मुलाखत

पणजी: चित्रपटांमुळे व्यक्तीला एक वेगळा आयाम मिळतो. चित्रपटांत जग बदलण्याची ताकद आहे आणि आजही माझा त्यावर विश्वास आहे. म्हणूनच मी आज येथे उपस्थित आहे, असे मत सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मुजफ्फर अली यांनी व्यक्त केले. शुक्रवारी २१ नोव्हेंबर रोजी इफ्फीमधील 'मास्टरक्लास' विभागाच्या उद्घाटनानंतर त्यांचे पुत्र शाद अली यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी मुजफ्फर अली यांनी चित्रपटसृष्टीतील आपला प्रवास उलगडून सांगितला. तत्पूर्वी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांच्या हस्ते मास्टरक्लास विभागाचे उद्घाटन झाले.
मुजफ्फर अली यांनी सांगितले की, 'झुनी' या चित्रपटातून मी काश्मीरची वेगळी ओळख आणि तेथील लोकांच्या समस्या दाखवण्याचा प्रयत्न केला होता. काश्मीर हे केवळ चित्रीकरणासाठीचे स्थळ नसून, तिथेही संस्कृती आहे, लोक आहेत आणि त्यांचे प्रश्न आहेत, हे मला जगाला दाखवायचे होते. ते म्हणाले की, इराणी चित्रपट सर्वांनाच आवडतात. इराणी दिग्दर्शकांनी अनेक समस्या असूनही आपल्या भागातील तथ्ये दाखवणाऱ्या चित्रपटांची निर्मिती केली. मला काश्मीरमधील स्थानिक तरुण कलाकारांकडून हेच अपेक्षित आहे. त्यांनी पुढे यावे, असे मला वाटते.

दिग्दर्शक शाद अली यांनी वडिलांच्या कामाबद्दल बोलताना सांगितले की, 'झुनी' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होण्यापूर्वीच काश्मीरमधील परिस्थिती बिघडली होती, ज्यामुळे मुजफ्फर यांना चित्रपटाची निर्मिती सोडावी लागले होते. मात्र, आज ३४ वर्षांनी मला या चित्रपटाचे रिस्टोरेशन करून तो पुन्हा प्रदर्शित करण्याची संधी मिळाली आहे. माझ्या वडिलांची अपुरी कलाकृती मला पूर्ण करता येणे, हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. ते पुढे म्हणाले, माझ्यासाठी चित्रपट हे एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाप्रमाणे काम करतात. चित्रपट आपल्याला हसवतात, आश्चर्यचकित करतात. चित्रपटात खरी जादू असते, असे मला वाटते.
![]()
चित्रपट क्षेत्रात भारताचा प्रभाव वाढला
तत्पूर्वी, केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी सांगितले की, इफ्फी सारखे महोत्सव जगभरात भारताच्या वाढत्या चित्रपट प्रभावाचे प्रतिनिधित्व करत आहेत. इफ्फी हा विकसित भारताच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासाशी सुसंगत आहे. महोत्सवात महिला सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून महिलांनी दिग्दर्शित केलेले ५० चित्रपट दाखवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
