दहा वर्षांनंतर गोव्यातील अधिकाऱ्याकडे उत्तर गोवा अधीक्षकपदाची जबाबदारी

वाढते गुन्हे रोखण्याचे आव्हान

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
15 mins ago
दहा वर्षांनंतर गोव्यातील अधिकाऱ्याकडे उत्तर गोवा अधीक्षकपदाची जबाबदारी

पणजी : गोव्यात (Goa) गेल्या काही दिवसांत पडलेले दरोडे, वाढती गुन्हेगारी या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारला लक्ष केले जात आहे. आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांची नियुक्ती होऊनही गुन्हे कमी झाले नाहीत. उलट दिवसेंदिवस त्यात वाढच होऊ लागली आहे.

या पार्श्वभूमीवर हरिश्चंद्र मडकईकर (Harishchandra Madkaikar)  यांची नियुक्ती उत्तर गोवा अधीक्षकपदी (North Goa Police Superitendent) करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस खात्यातही (Goa Police) सकारात्मक चर्चा सुरू आहे. आता वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान गोव्यातील उत्तर जिल्हा पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांच्यापुढे आहे.

गोव्यात यापूर्वी मूळ गोमंतकीय असलेले अनेक चांगले पोलीस अधिकारी होऊन गेले. संघर्ष करीत पुढे आलेल्या या अधिकाऱ्यांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणून गोव्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

या पोलीस अधिकाऱ्यांचा एक वेगळा वचक व खाक्या होता. कायदा व सुव्यस्था सांभाळण्यासाठी त्यांना मोकळी सुट होती. त्यात नावे घ्यायची झाल्यास प्रभाकर सिनारी, महेश गावकर, उमेश गावकर, अॅलन डिसा, बोसुएट सिल्वा, सेमी तावारीस या निवृत्त पोलीस अधीक्षक यांच्यासहीत विद्यमान पोलीस अधीक्षक संतोष देसाई अशा अनेक अधिकाऱ्यांची नावे घेता येतील.

डीआयजी म्हणून निवृत्त झालेले अरविंद गावस (आयपीएस) (IPS (retd) Arvind Gawas), बॉस्को जॉर्ज (आयपीएस) (IPS (retd) Bosco George) यांचा ही या अधिकाऱ्यांमध्ये समावेश होता.

गोव्याचे बदलते स्वरुप 

 गोवा आता पूर्णपणे बदललेला आहे. गोव्यात पर्यटन व्यवसाय त्यावेळी एवढा वाढलेला नव्हता. त्याचबरोबर गोव्याबाहेरून नोकरी, व्यवसाय व इतर कामांसाठी येणाऱ्यांची संख्याही कमी होती. आता पर्यटन व्यवसायही जोमाने वाढत आहे. त्यातूनच काही अमली पदार्थ व त्या अनुषंगाने इतर नकारात्मक बाबीही गोव्यात फोफावू लागल्या आहेत. कॅसिनोचे प्रस्थ गोव्यात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील गुन्हेगारी वाढत आहे. दरोडा, घरफोड्या व तत्सम गुन्ह्यांत गुंतलेले आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत. साहजकीकच गुन्हेगारीही वाढत आहे. 

वाढते गुन्हे, दरोड्यांमुळे चिंता 

गोव्यात गेल्या काही महिन्यांत अनेक गुन्हेगारी घटना घडल्यात. गणेशपुरी, म्हापसा येथे डॉक्टरांच्या बंगल्यावर पडलेल्या सशस्त्र दरोड्यानंतर बायणा, वास्को येथे चार दिवसांमागे नायक कुटुंबियांच्या फ्लॅटवरही सशस्त्र दरोडा टाकून ३५ लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. गणेशपुरी, म्हापसा येथे डॉक्टराच्या बंगल्यावर दरोडा टाकलेले तर गोव्यासहीत अन्य राज्यांतील पोलिसांच्या हातावर तुरु देऊन बांगलादेशमध्ये पोहोचल्याचे तपासास पुढे आले आहे. 

वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याबरोबरच गेल्या काही दिवसांत घडलेले गुन्हे, दरोडे यांचा तपास करून आरोपींना गजाआड करण्याचे आव्हान उत्तर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांच्यापुढे आहे.  पोलीस अधीक्षक मडकईकर यांची प्रतिमा चांगली असल्यामुळे एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला न्याय मिळाल्याची भावना सध्या व्यक्त होत आहे. 

मडकईकर अनुभवी पोलीस अधिकारी  

मुख्य म्हणजे मडकईकर पोलीस सेवेत रुळलेले अधिकारी आहेत. पोलीस उपनिरीक्षक, निरीक्षक, उपअधीक्षक ते पोलीस अधीक्षकापर्यंत पोचलेले अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पोलीस सेवेतील प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात होणार असल्याचे मानले जात आहे. त्यासाठीच उत्तर जिल्हा पोलीस अधीक्षकाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 


हेही वाचा