सरकारी जोडीदार शोधताय? गोव्यात १३ हजार सरकारी कर्मचारी अद्याप अविवाहित!

सरकारी कर्मचारी सर्वेत माहिती उघड

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
56 mins ago
सरकारी जोडीदार शोधताय? गोव्यात १३ हजार सरकारी कर्मचारी अद्याप अविवाहित!

पणजी : जीवनसाथी सरकारी नोकरच पाहिजे म्हणून स्थळ शोधणाऱ्यांसाठी एक बातमी आहे. गोव्यातील ६३,९७० सरकारी कर्मचाऱ्यांपैकी ५१,०५५ कर्मचाऱ्यांनी आपण विवाहित असल्याची माहिती अहवालाच्या सर्वे दरम्यान दिली आहे तर तब्बल १२,९०७ कर्मचारी अविवाहित आहेत. ८ कर्मचाऱ्यांनी आपल्या लग्नाविषयी काही माहिती दिलेली नाही. सरकारी खात्यांमध्ये काम करणारे ९,०२१ कर्मचारी अविवाहित आहेत तसेच अनुदानित संस्थांमधील २,९७७, तर महामंडळांसारख्या संस्थांमध्ये ६७२ कर्मचारी अविवाहित आहेत.

सरकारी नोकर भरतीत २०१९ ते २०२४ पर्यंत काही सकारात्मक बदल दिसले आहेत. नव्या अहवालाप्रमाणे या पाच वर्षांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये एसटी, एससी आणि ओबीसी वर्गातील ३,८१० कर्मचाऱ्यांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१९च्या अहवालात या वर्गांतील सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या १६,७८१ इतकी होती ती २०२४ च्या अहवालात २०,५१९ इतकी झाली आहे.

१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा उपलब्ध नसला तरी या दरम्यान फक्त ८०८ कर्मचाऱ्यांची भर पडली आहे असेच म्हणावे लागेल. पण, या दरम्यान झालेल्या नोकर भरतीत आदिवासी, अनुसूचित जाती आणि ओबीसीच्या वर्गातील कर्मचाऱ्यांची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सरकारी कर्मचारी २०१९ मध्ये ६३,१६२ इतके होते ते २०२४ मध्ये ६३,९७० इतके झाले. यात सरकारी खाती, स्वायत्त संस्था, सरकारी अनुदानित संस्था आणि महामंडळांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मोठ्या लोकसंख्येचे तालुके असलेल्या सासष्टी आणि बार्देशमधील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी घट झाली आहे. २०१९च्या अहवालात सासष्टी तालुक्यात ९,५७६ सरकारी कर्मचारी होते ते २०२४ मध्ये ८,७०१ इतके झाले आहेत, तर बार्देशमध्ये ९,७३८ कर्मचारी होते ते आता ९,२५७ इतके झाले आहेत. सासष्टीत ८७५, तर बार्देशमध्ये ४८१ सरकारी कर्मचारी मागच्या तुलनेत कमी झाले आहेत. या आकड्यांवरून निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही गोव्यात जास्त आहे हे अधोरेखित होते.

२०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकादरम्यान झालेली नोकर भरतीचा प्रभावही या अहवालातून दिसतो. २०१९ ते २०२४ या पाच वर्षांमध्ये सत्तरी तालुक्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या १ हजाराने वाढली आहे. २०१९ मध्ये ती संख्या ४,४६६ होती ती आता ५,४४४ इतकी झाली आहे. फोंडा तालुक्यात मागच्या वेळी ८,४१३ सरकारी कर्मचारी होते ते आताच्या अहवालात ८,७०४ इतके झाले आहेत.

२०१९ च्या अहवालात गोव्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये एसटी नोकरदारांची संख्या ५,९८२ होती ती आता ७,४९० इतकी झाली आहे. ओबीसींची संख्या ९,४७० होती ती आता ११,६७२ झाली आहे, तर एससींची संख्या १,३२९ होती ती आता किंचित वाढून १,४२९ झाली आहे. दरम्यान, गोवा सरकारच्या वेगवेगळ्या ८९ सरकारी खात्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या ४३,९२१ इतकी आहे. त्यात ३०,२२२ पुरुष, तर १३,६९९ महिलांचा समावेश आहे.

सरकारी अनुदानित संस्थांमध्ये १५,८२९ कर्मचारी आहेत. ज्यात ९,४०४ महिला आहेत आणि ६,४२५ पुरुष आहेत. अनुदानित संस्थांमध्ये शाळांची संख्या मोठी आहे. शिक्षण संस्थांमध्ये ९,९४६ कर्मचारी आहेत ज्यात सर्वाधिक ७,०१९ महिला आहेत.

स्वायत्त संस्था ज्यात विद्यापीठ, मराठी अकादमी, कोकणी अकादमी अशा १४ संस्थांचा समावेश आहे तिथे ८४८ कर्मचारी आहेत. सर्वाधिक ६४४ कर्मचारी गोवा विद्यापीठात आहेत. महामंडळे आणि इतर मिळून २० संस्थांमध्ये ३,३७२ कर्मचारी आहेत. ज्यात २,८६८ पुरुष आणि ५०४ महिला कर्मचारी आहेत. असे मिळून सरकारी सेवेत ६३,९७० कर्मचारी आहेत.

हेही वाचा