
मडगाव: मडगाव खारेबांध येथून दोन दिवसांपूर्वी अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल असलेल्या मुलीसह, नावेली मांडप येथून हरवलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा शोध अखेर मडगाव पोलिसांनी घेतला आहे.
मोड्डी मांडप, नावेली येथील मोहम्मद अस्लम ताकी यांनी मडगाव पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानुसार, १८ नोव्हेंबर रोजी त्यांची १४ वर्षीय आणि ११ वर्षीय अशा दोन मुलांचे अज्ञातांकडून अपहरण करण्यात आले होते. मडगाव पोलिसांनी या दोन्ही मुलांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक देखरेखीचा वापर केला. ही दोन्ही मुले उत्तर प्रदेश येथे त्यांच्या मामाच्या घरी गेलेली असल्याचे तपासात आढळून आले.
याचदरम्यान, १६ नोव्हेंबर रोजी मडगाव खारेबांध येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात शोध घेत असताना, सदर मुलगी दिल्ली येथे सापडली. तीसुद्धा आपल्या नातेवाईकांकडेच गेलेली होती, असे पोलिसांनी सांगितले. अल्पवयीन मुले हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर, नियमानुसार अपहरण झाले म्हणून गुन्हा नोंद करावा लागतो, त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणातही अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता.
यापूर्वी १० नोव्हेंबर रोजी कोलवा पोलीस स्थानकात सध्या माजोर्डा येथे राहणाऱ्या व मूळ झारखंड येथील पूनम केरकेट्टा यांनी आपल्या १४ वर्षीय मुलासह त्याच्या आणखी दोन अल्पवयीन मुलांचे अज्ञातांकडून अपहरण झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर कोलवा पोलिसांनी तांत्रिक देखरेखीच्या माध्यमातून सदर मुलांना कोझिकोडे, केरळ येथून शोधून परत आणत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले होते.