दुर्दैवी घटनेने गोधरा परिसर हादरला

गुजरात : घरात मोठ्या मुलाच्या साखरपुड्याच्या तयारीने वेग घेतला होता. त्यामुळे कुटुंबीय आनंदात होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. घराला लागलेल्या आगीत होत्याचे नव्हते झाले आणि कुटुंबातील चारही सदस्य मृत्यूमुखी पडले. (Four members of a family died ).
अचानक घडलेल्या या भयानक घटनेने गोधरातील (Godhra) अनेकांना धक्का बसला. गुजरातमधील (Gujarat ) गोधरा येथे ही घटना घडली.
या घटनेत व्यवसायाने सोनार (jeweller) असलेले कमल दोषी (५० वर्षे), पत्नी देवल बेन ((४५ वर्षे), देव (२४ वर्षे), राज (२२ वर्षे) हे दोन्ही मुलगे मृत्यू पावले. आग लागल्यानंतर पसरलेल्या धुरात गुदमरून मृत्यू पावल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, गंगोत्री नगर येथील बामरौली रोडवरील वृंदावन २ सोसायटीत दोषी कुटुंब राहत होते. त्यांच्या घरातून धूर येत असल्याचे बाजूच्या लोकांनी पाहिले. त्यांनी पोलीस व अग्नीशमन दलाला माहिती दिली.
मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घराचा मुख्य दरवाजा तोडला असता त्यांना धक्काच बसला. घरात पती पत्नी व दोन मुले बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अग्निशमन दलाच्या प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या घटनेचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीमचे सहकार्य घेण्यात येत आहे. तपासानंतर आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दोषी यांच्या मुलाचा साखरपुडा पुढील काही दिवसांत होणार होता. त्याची तयारी जोरात सुरू होती. मात्र, त्यापूर्वीच संपूर्ण कुटुंब मरण पावल्याने गोधरा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.