धावत्या कोकणकन्या एक्सप्रेसमधून उतरण्याच्या प्रयत्नात प्रवासी पडला

व्हिडिओ व्हायरल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 mins ago
धावत्या कोकणकन्या एक्सप्रेसमधून उतरण्याच्या प्रयत्नात प्रवासी पडला

मडगाव: मडगाव रेल्वेस्थानकावरून सुटलेल्या कोकणकन्या एक्स्प्रेस गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करताना प्लॅटफॉर्मवर पडलेल्या एका प्रवाशाला रेल्वे सुरक्षा दलाच्या दोन दक्ष कर्मचाऱ्यांनी वाचवून जीवदान दिले.



ही घटना रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मडगाव रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर घडली. मडगाव येथून मुंबईला जाणारी रेल्वे क्रमांक २०१९२ (कोकणकन्या एक्स्प्रेस) गाडी फलाटावरून निघाली असताना, गणेश लिंबराज श्रीदत्त (६६, उस्मानाबाद, महाराष्ट्र) नावाचा एक प्रवासी चालत्या रेल्वेतून खाली उतरताना फलाट आणि रेल्वेच्या मधल्या जागेत पडला. येथेच तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाचे कॉन्स्टेबल कपिल सैनी आणि रबारी सैंदा भाई (आर. एस. भाई) यांनी तत्काळ पुढे धाव घेतली. त्यांनी प्रवाशाला ओढून फलाटावर घेतले आणि रेल्वेखाली जाण्यापासून वाचवले.




श्रीदत्त हे मूळचे उस्मानाबादचे असून, ते मडगाव येथून थिवीला जाण्यासाठी गाडीत चढले होते. काही कारणास्तव पुन्हा खाली उतरण्याच्या प्रयत्नात ते पडले. रेल्वे सुरक्षा दलाच्या या दोन्ही कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला उतरताना पाहून प्रसंगावधान राखून निर्णय घेतल्यामुळे त्यांचा जीव वाचला. या कामगिरीबद्दल प्रवाशाने दोन्ही कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

हेही वाचा