मोरजी खून प्रकरण: १५ दिवस उलटले तरी मुख्य संशयित फरार

जमीन वादातून झाला होता ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा खून; तिघे अटकेत

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
मोरजी खून प्रकरण: १५ दिवस उलटले तरी मुख्य संशयित फरार

पेडणे : वरचा वाडा, मोरजी येथील ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिक उमाकांत खोत यांच्या जमीन वादातून झालेल्या निर्घृण खुनाला पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे, तरीही या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अद्याप मांद्रे पोलिसांना सापडलेला नाही. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि पंचायतीमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वरचा वाडा, मोरजी येथील उमाकांत खोत यांची असलेली कुळाची जमीन त्या जमिनीच्या मालकाने खोत यांना विश्वासात न घेता अशोक कुमार नंदुरुमली यांना परस्पर विकली होती. या जमिनीवर बेकायदेशीरपणे रस्ता तयार करण्यात आला होता आणि डोंगर कापणीचे काम सुरू होते. उमाकांत खोत यांनी गेले वर्षभर टीसीपी खात्याकडे याबाबत लेखी तक्रारी केल्या होत्या, पण दखल घेतली गेली नाही. दरम्यान ५ नोव्हेंबर रोजी उमाकांत खोत आपल्या जमिनीमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कामाची पाहणी करण्यासाठी गेले असता, त्यांना जबर मारहाण करण्यात आली आणि त्यातच त्यांचा खून झाला.

तपास आणि अटक:

या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी अशोक कुमार नंदुरुमली, सुपरवायझर लोकेश पुत्ता स्वामी (५३), जेसीपी ऑपरेटर रोहित कुमार प्रजापती (२०) आणि विजय ससुप्पन (३६) अशा एकूण चार जणांवर गुन्हा नोंदवला होता. त्यापैकी लोकेश, रोहित आणि विजय या तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांची १४ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या तिन्ही संशयितांनी जामिनासाठी अर्ज सादर केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

मुख्य संशयित अद्याप फरार

या प्रकरणातील मुख्य संशयित, अशोक कुमार नंदुरुमली याला मात्र मांद्रे पोलीस अजूनही अटक करू शकलेले नाहीत. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण करण्याचे आदेश याच मुख्य संशयिताने फोनद्वारे दिले होते. अशोक कुमार हा बंगळुरू येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, मांद्रे पोलीस निरीक्षक गिरेन्द्र नाईक यांनी मुख्य संशयिताच्या शोधासाठी पोलीस पथके बंगळुरूसह विविध ठिकाणी रवाना झाली असल्याची माहिती दिली आहे. संशयिताला लवकरच पकडले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

पंचायतीकडून कायदेशीर कारवाईची मागणी

रविवार, २३ नोव्हेंबर रोजी सरपंच विलास मोर्जे यांच्या अध्यक्षतेखाली मोरजी पंचायतीची ग्रामसभा झाली. यावेळी खोत यांच्या खून प्रकरणावर चर्चा झाली. सरपंच विलास मोर्जे पोलिसांनी पकडलेल्या तिन्ही संशयितांसह मुख्य संशयितालाही पकडून सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच, पंचायतीमार्फत ज्या जमिनीमध्ये बेकायदेशीर रस्ता केलेला आहे, ती जमीन पूर्ववत केली जाईल, असे आश्वासन सरपंच मोर्जे यांनी दिले.

स्थानिक नागरिकांनी सर्व्हे क्र. १५ ६/३ मधील जमिनीतील प्रकल्पाला सरकारने दिलेली मान्यता त्वरित रद्द करावी, अशी मागणी केली आहे. यावर आमदार जीत आरोलकर यांनी ग्रामस्थांना त्यांची मागणी लेखी स्वरूपात सरकारकडे देण्यास सांगितले असून, योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा