दुर्धर आजाराने ग्रस्त : मुंबईत उपचारांसाठी ३५ ते ४० लाखांचा खर्च

पेडणे : कासारवर्णे ग्रामपंचायत क्षेत्रातील मोपा पठारावरील रहिवासी असलेला उमेश वरक हा गंभीर आजाराने त्रस्त असून मुंबई येथील एका खासगी इस्पितळात उपचार घेत आहे. त्याच्या उपचारांसाठी सुमारे ३५ ते ४० लाख रुपये हाॅस्पिटलचा खर्च येणार असून त्याच्या कुटुंबीयांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. उमेश वरक याला पुनर्जन्म प्राप्त करून देण्यासाठी लोकांनी सढळहस्ते मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दुर्धर आजाराने त्रस्त असलेला उमेश हा गोवा अग्निशामक दलात वाहन चालक म्हणून दोन वर्षांपूर्वीच कामावर रुजू झाला होता. उमेश हा हृदय रूग्ण असून हृदय बदलण्यासाठी (heart transplant) मुंबई येथील मुलुंड गोरेगावच्या फोर्टिस या खासगी इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्याचे हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी सुमारे ३५ ते ४० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. उमेश यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून त्यांच्या कुटुंबाला एवढा खर्च करणे शक्य होणार नाही. हृदय प्रत्यारोपणासाठी त्याला आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे. त्यासाठी गोमंतकीय जनतेकडून आर्थिक मदतीची हाक वरक कुटुंबीयांनी दिली आहे.
दात्यांनी त्याला आर्थिक मदत करून या दुर्धर आजारातून बरे होण्यासाठी मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.