साहित्यिक प्रभा वर्मा : अ. भा. कोकणी साहित्य संमेलनाला केरळमध्ये प्रारंभ

एर्नाकुलम : साहित्याचा अनुवाद नेहमीच एक महत्त्वाची भूमिका बजावत असतो. अनुवाद हा सांस्कृतिक देवाणघेवाण, विविधतेचा पुरस्कार करत आपल्या संवैधानिक मूल्यांचा पाया ठरला आहे. भाषांतर हा जगाला जोडणारा, एका संस्कृतीला दुसऱ्या संस्कृतीशी जोडणारा आणि ‘ग्लोबल व्हिलेज’च्या निर्मितीत योगदान देणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे आपण भाषांतरावर भर दिला पाहिजे. भारतीय भाषांमध्ये पुरेशी देवाणघेवाण होताना दिसत नाही. प्रत्येक भाषा एकमेकांपासून अंतर राखून राहते. ही स्थिती बदलायला हवी, असे मत ज्येष्ठ लेखक प्रभा वर्मा यांनी व्यक्त केले.
२६ व्या अ. भा. कोकणी साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संमेलनाचे अध्यक्ष कवी माधव बोरकर यावेळी उपस्थित होते. सन्माननीय पाहुण्यांमध्ये राजभाषा उपसंचालक अनिल सावंत, संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष चेतन आचार्य, सचिव स्नेहा सबनीस, स्वागताध्यक्ष सदानंद भट, कार्यकारी अध्यक्ष आनंद कामत आणि इतर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रभा वर्मा पुढे म्हणाले, कोकणी भाषा गोवा, महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकच्या काही भागात बोलली जाते. तिला एक उत्तम सांस्कृतिक परंपरा आहे. त्यात १०व्या शतकातील भक्ती चळवळीतील गाणी आणि कविता आहेत. १६व्या शतकात पोर्तुगीज आले, तेव्हा कोकणीवर त्यांच्या भाषेचा प्रभाव पडला. नंतर थॉमस स्टीव्हन्स, शणै गोंयबाब आणि इतर शेकडो लेखकांनी कोकणीला समृद्ध केले. कोकणीला सतत संघर्ष करावा लागला आहे. आज कोकणी इतर भाषांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे.
लिपी वादामुळे कोकणीचे नुकसान!
माधव बोरकर म्हणाले, कोकणी साहित्याचा इतिहास लिहिताना येणाऱ्या काही अडचणी लिपींच्या आहेत. लिपींच्या भिंतींनी कोकणी साहित्याचे मोठे नुकसान केले आहे. अन्यथा आपले साहित्य मोठ्या वेगाने पुढे गेले असते. ही परिस्थिती आता काही प्रमाणात बदलत आहे. जेव्हा या भिंती कोसळतील तेव्हा कोकणीच्या क्षेत्रात खरोखरच सुवर्णकाळ उदयास येईल. तो भाग्यशाली काळ लवकरच येवो.
आनंद कामत, अनिल सावंत आदींनी मनोगत व्यक्त केले. साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार विजेत्या नयना आडारकर आणि अनुवाद पुरस्कार विजेते मिलिंद महामल यांना लेखिका प्रभा वर्मा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
चेतन आचार्य यांनी सूत्रसंचालन, सदानंद भट यांनी स्वागत केले. स्नेहा सबनीस यांनी आभार मानले. अनंत अग्नी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. त्यानंतर विविध चर्चासत्रे झाली. रविवारी दुपारी साहित्य संमेलनाचा समारोप होईल. त्यापूर्वी विविध चर्चासत्रे आणि कार्यक्रम होतील.