‘स्मार्ट सिटी’ची निविदा : मालमत्ता व्यवस्थापनासह पायाभूत सुविधांसाठी ठरणार उपयुक्त

पणजी : पणजी शहराला भविष्यात अधिक स्मार्ट बनवण्यासाठी डिजिटल मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण शहराचा तपशीलवार डिजिटल नकाशा तयार केला जाईल आणि ‘क्लाऊड डेटा’द्वारे तो उपलब्ध करून दिला जाईल. शहराच्या संसाधनांचे योग्य नियोजन करण्यासाठी डिजिटल मॅपिंग उपयुक्त ठरणार आहे. इमॅजीन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने या संदर्भात निविदा जारी केली आहे.
थ्रीडी पॉईंट क्लाऊडद्वारे शहरी मालमत्ता व्यवस्थापन आणि सिम्युलेशन-आधारित नियोजन सुलभ करणे तसेच पूर कमी करण्याच्या योजनांसाठी परिस्थितीजन्य विश्लेषण करणे हा प्रस्तावित डिजिटल योजनेचा उद्देश आहे.
‘स्मार्ट सिटी’कडे आवश्यक नागरी पायाभूत सुविधांबद्दल मोठ्या प्रमाणात डेटा उपलब्ध आहे. तथापि, या डेटाचे स्वरूप विस्कळीत असून तो केंद्रीकृत नाही. त्यामुळे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेसाठी त्याचा सहजपणे उपयोग होत नाही.
पणजी शहरातील सांडपाणी, पाण्याचे स्रोत, रस्ते आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील मालमत्तांसारख्या नागरी पायाभूत सुविधांचा या डेटामध्ये समावेश आहे. एलआयडीएआर तंत्रज्ञान आणि पॉईंट क्लाऊड तंत्रज्ञानाशी संबंधित थ्रीडी डेटा तसेच भौगोलिक माहितीबद्दलच्या फायली आहेत. तथापि, उपलब्ध डेटा सुरक्षित, परस्परसंवादी नसून त्याचे केंद्रीकृत प्लॅटफॉर्मवर प्रभावीपणे विश्लेषण केले जाऊ शकत नाही. ही कमतरता भरून काढण्यासाठी आणि एक अचूक, सर्वसमावेशक वेब आधारित प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी स्मार्ट सिटीने निविदा काढली आहे.
...
केंद्र सरकारकडून मिळणार निधी
सप्टेंबर २०२५ मध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाने पणजी स्मार्ट सिटीची निवड केली होती. या डिजिटल योजनेसाठी संकल्पना योजना तयार करण्यासाठी आम्ही सल्लागार नियुक्तीसाठी निविदा जारी केली आहे. आम्हाला १५ डिसेंबरपर्यंत ही संकल्पना योजना केंद्राकडे पाठवायची असून त्यानंतरच निधी मंजूर होईल, असे ‘स्मार्ट सिटी’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.