व्ही. शांताराम, गुरू दत्त ते ऋत्विक घटक यांना खास आदरांजली; श्याम बेनेगल यांच्या कार्याचा होणार गौरव

पणजी: ५६ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव केवळ नव्या चित्रपटांसाठीच नव्हे, तर भारतीय चित्रपटसृष्टीच्या अमूल्य वारसा जपण्यासाठीही खास ठरत आहे. 'एनएफडीसी-नॅशनल फिल्म अर्काईव्ह ऑफ इंडिया' (NFAI) द्वारे 'नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन' (NFHM) अंतर्गत रेस्टोर्ड केलेले १८ क्लासिक चित्रपट 'इंडियन पॅनोरमा स्पेशल पॅकेज'मधून रसिकांसाठी सादर केले जात आहेत. हिंदी, तेलुगू, मल्याळम, बंगाली आणि मराठी अशा विविध भाषांमधील कलात्मक चित्रपट जतन करण्यात आले आहेत.
दिग्गजांना शताब्दी आणि १२५ वर्षांची आदरांजली
या वर्षीच्या IFFI कार्यक्रमाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. महोत्सवात व्ही. शांताराम यांच्या चित्रपट प्रवासाला १२५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल खास मानवंदना दिली जाणार आहे, तसेच गुरू दत्त, राज खोसला, ऋत्विक घटक, भूपेन हजारिका, पी. भानुमती, सलिल चौधरी आणि के. वैकुंठ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली जाईल. या महोत्सवात चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या 'सुसमन' (Susman) या चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला असून त्यांच्या योगदानाचा गौरव केला जाईल.
)
रेस्टोरेशनचा कठोर प्रवास
'नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन' अंतर्गत कॅमेरा निगेटिव्ह, दुर्मिळ प्रिंट्स आणि संग्रहण सामग्रीचे जतन, डिजिटायझेशन आणि पुनर्संचयन करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम केले जात आहे. IFFI मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटांचे रेस्टोरेशन करताना, शक्य असेल तेव्हा मूळ चित्रपट निर्माते, सिनेमॅटोग्राफर किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेम-बाय-फ्रेम डिजिटल रेस्टोरेशन आणि कलर ग्रेडिंग करण्याचे काम केले गेले आहे.


या कार्यक्रमातील सर्वात दुर्मिळ चित्रपट म्हणजे बाबुराव पेंटर यांचा १९२७ मधील 'मुरलीवाला' हा मूकपट (Silent Film). बाबुराव पेंटर यांच्या दोन मुलींच्या उपस्थितीत, संगीतकार राहुल रानडे यांच्या खास लाईव्ह संगीत साथीने हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. रमेश सहगल यांचा 'शहीद' (१९४८) आणि मणिरत्नम यांचा 'गीतांजली' यांसारख्या चित्रपटांसह विविध युगांतील कलाकृती या निवडक संचात आहेत.