
पणजी: हल्ली सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ कधी आणि कसा व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. पण नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने केवळ मनोरंजनच नाही, तर आठ महिने जुने एक रहस्य उलगडून दाखवले आहे! हा व्हिडिओ पाहताना सामान्य माणसाच्या डोक्यात मुंग्या येतील.
'डोगेश भाई'ने केले तरी काय ?
काही दिवसांपूर्वी एका तपकिरी रंगाच्या कुत्र्याचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला. गळ्यात पट्टा असलेला हा कुत्रा एका मारुती सुझुकी कारच्या पुढच्या बंपरवर पूर्ण ताकदीने तुटून पडला होता. बऱ्याच प्रयत्नानंतर त्याने तो बंपर अक्षरशः फाडून टाकला आणि मग त्याच्या हल्ल्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट झाले: कारच्या आत लपलेल्या एका उंदराला तो बाहेर काढत होता. मिशन पूर्ण झाल्यावर उंदराला पकडून 'डोगेश भाई' तिथून सटकला. नेटकऱ्यांनी या 'डोगेश भाई'चे कौतुक केले. काही म्हणाले वाह! कार मालकाचे मोठे नुकसान वाचवले! तर काहींनी गोव्याच्या नंबर प्लेट असलेल्या त्या कारच्या बिल्ड क्वालिटीची खिल्ली उडवली. एकजण म्हणाला, माझ्या गाडीची सर्विस करायची आहे, डोगेश भाईचे गॅरेज कुठे आहे ?
दरम्यान अता समोर आलेल्या माहितीनुसार डोगेश भाईचे नाव 'चिकू' असून तो शेट्येवाडा, म्हापसा येथील असल्याचे उघड झाले आहे. 'चिकू' जानेवारी २०२५ पासून बेपत्ता होता आणि त्याच्या मालकिणीला, श्रद्धा यांना तो कुठे आहे याची काहीच माहिती नव्हती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर श्रद्धा यांनी तो पाहिला आणि केवळ 'चिकू'चा उदव्याप आणि त्याचा उंदरांना पकडण्याचा 'जोश' पाहून त्यांनी ओळखले की हा आपलाच हरवलेला लाडका कुत्रा आहे.
आता 'डोगेश भाई'च्या या उपहासात्मक कीर्तीनंतर, त्याची मालकीण श्रद्धा यांनी नागरिकांना कळकळीची विनंती केली आहे की, ज्यांना कुणालाही चिकूबद्दल माहिती असेल त्यांनी कृपयाकरून त्यांची माहिती द्यावी.जेणेकरून तो आणखी कोणत्या कारचा बंपर फाडण्याआधी घरी परतेल! (आणि त्या गरीब कारवाल्याला थोडा तरी दिलासा मिळेल!)