सर्व मुलांचा शोध घेऊन पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले.

मडगाव: दक्षिण गोवा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मागील ४५ दिवसांच्या कालावधीत एकूण १० अल्पवयीन मुले बेपत्ता असल्याची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, या सर्व मुलांचा पोलिसांनी त्वरित शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.
दक्षिण गोव्यात मागील दीड महिन्यात (४५ दिवसांत) १० मुलांच्या बेपत्ता होण्याची प्रकरणे नोंदवली गेली. कायद्याच्या आवश्यकतेनुसार आणि मुलांच्या सुरक्षिततेशी संबंधित बाबींना प्राधान्य देत, सर्व प्रकरणांमध्ये तत्काळ गुन्हा नोंद करण्यात आला.
ऑक्टोबर महिन्यात वास्को, वेर्णा व फोंडा येथे प्रत्येकी एक अल्पवयीन मुलांचे प्रकरण नोंद झाले होते. तसेच, नोव्हेंबर महिन्यात एकूण सात प्रकरणे नोंद करण्यात आलेली आहेत. यामध्ये मडगाव येथे तीन, तर कोलवा, कुंकळळी, केपे, आणि वास्को येथे प्रत्येकी एका प्रकरणाचा समावेश आहे. या सर्व प्रकरणातील मुलांचा शोध पोलिसांनी पूर्ण केला आहे. पोलिसांच्या विशेष पथकांच्या प्रयत्नांमुळे आणि तांत्रिक देखरेख व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, सर्व बेपत्ता अल्पवयीन मुलांना यशस्वीरित्या शोधण्यात आले. त्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. दक्षिण जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख सर्व नागरिकांच्या, विशेषतः मुले आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि संरक्षणासाठी कार्यरत आहेत.